पोलिसांना आता ‘वर्क फ्रॉम होम’!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय तसेच सह्व्याधी असणाऱ्या पोलिसांना कर्तव्यावर न बोलवता शक्य झाल्यास त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची कामे देण्यात यावीत, असे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहे. मागील कोरोनाच्या दोन लाटेमध्ये राज्यात ५०० आणि मुंबईत १२३ पोलिसांना जीव गमवावा लागला होता, त्यात ५५ वर्षे वय असलेले आणि इतर व्याधी असलेल्या पोलिसांची संख्या अधिक होती, त्यामुळे यावेळी ही दक्षता घेण्यात येत असल्याचे समजते.

या पोलिसांना सवलत देण्यास सांगितले

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठी आकडेवारी होती. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे तसेच पोलिसांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. डॉक्टरांना प्रमाणेच पोलिसदेखील लोकांच्या थेट संपर्कात येत असल्याने पोलिसांना विषाणूची झपाट्याने लागण होत गेली आणि शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पोलिस पुन्हा कोरोनाचे बळी ठरू नयेत यासाठी त्यांची काळजी घेतली जात आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे १ जानेवारीपासून ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्य शस्त्रक्रिया, कर्करोग, अंजोप्लास्टी शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रतिरोपण, रक्तवाहिन्या संबंधित इतर कोणते आजार असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर बोलावू नये, असे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयातून सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना देण्यात आले आहेत. मनुष्यबळ कमी असेल आणि एखादा पोलिस कर्तव्यावर असेल तर थेट नागरिकांशी संपर्क येईल, असे काम देऊ नये. या पोलिसांकडून घरून काम करून घेणे शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना राबविण्यात यावी, असेही या निर्देशात म्हटले आहे.

(हेही वाचा समीर वानखेडेंची बदली, महसूल गुप्तचर संचालनालयात पुन्हा नियुक्ती)

सध्या राज्यात २१९ पोलिस कोरोनाबाधित

राज्यात रुग्णवाढीप्रमाणे पोलिस दलामध्येही संसर्ग वाढत आहे. मुंबई पोलिस दलामध्ये सद्यस्थितीत १५४ सक्रिय रुग्ण असून राज्यात २१९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या अधिक वाढू नये यासाठी पोलिस वसाहती, पोलिस ठाणी, पोलिसांची शासकीय वाहने यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here