मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा अशा मागणीची ४ हजार पोस्ट कार्ड्स सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
( हेही वाचा : मालकांनो! … तर अपघाताची जबाबदारी तुमचीच )
४ हजार पोस्ट कार्ड्स
मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा “अभिजात” दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड्स राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली आहेत. हा पोस्ट कार्ड्स पाठविण्याचा दुसरा संच आहे, याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपतींना पाठविण्यात आला आहे.
सध्या ६ भाषांना अभिजात दर्जा
महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक मंत्रालयाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला आहे. देशात सध्या तामिळ, तेलूगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना सध्या अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राने जे निकष लावले आहेत. त्यानुसार, संबंधित भाषेला 1500 ते 2 हजार वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा. प्राचीन काळात संबंधित भाषेतील साहित्याबाबत पुरावे असावेत. तसेच संबंधित भाषेत मूळ साहित्यिक परंपरा असावी, ती इतर बोली भाषेतून आलेली नसावी अशी अट आहे.
Join Our WhatsApp Community