अवघ्या जगाला शिवकालीन इतिहास उलगडून सांगणारे तपस्वी व्यक्तिमत्व असलेले शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्म-विभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. वयाची शतकपूर्ती करताना आजही बाबासाहेबांच्या आवाजातील धार, नजरेतील करारीपणा कमी झालेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आजही तरुणांना लाजवणारे आहे. उभे आयुष्य केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्यास घेऊन त्यासाठी झटणारे बाबासाहेब पुरंदरे यांनी तीन पिढ्यांपर्यंत महाराजांचा इतिहास सांगितला आणि तो खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला.
आपल्याकडे महापुरुषांच्या पराक्रमाची वानवा नाही, पण…
बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२ साली पुण्यातील सासवड या गावामध्ये झाला. लहानपणापासूनच बाबासाहेबांना इतिहासात गोडी होती. त्यांचे वक्तृत्त्व उत्तम होते, अभ्यासू वृत्ती होती. आज बाबासाहेब एक उत्तम लेखक, कादंबरीकार, शिवशाहीर, वक्ते, नाटककार आणि इतिहासकार आहेत. इतिहासकार ही खूप खोल व्याप्ती असलेली बाब आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे जेव्हा शिवकालीन इतिहासाचे संशोधन करतानाचे आलेले अनुभव कथन करता तेव्हा ते इतिहास डोळ्यांसमोर उभा करतात. आपल्याकडे महापुरुषांच्या पराक्रमाची वानवा नाही, पण त्यांचा अभिमान असणाऱ्यांचा तुटवडा आहे, असे बाबासाहेब पुरंदरे कायम म्हणतात. त्यादृष्टीने त्यांना आलेला एक विलक्षण अनुभव त्यांनी एका मुलाखतीमध्ये कथन केला होता. तो आजच्या पिढीसाठी शिकण्यासारखा आहे. बाबासाहेब लंडनमध्ये काही काळ राहिले होते, त्या काळात एके दिवशी त्यांना एक पत्र पाठवायचे होते. ते राहत होते तिकडे जवळच डाकघर असल्याने ते थेट डाकघरातच गेले. तिकडे अनेक पत्रे गोळा केली जात होती. बाबासाहेबांना वाटले आपणही पटकन पत्र देऊन टाकू म्हणजे लवकर पोहचेल. त्यासाठी त्यांनी डाकघरातील कक्षात बसलेल्या मुलीकडून पोस्टाचे तिकीट विकत घेतले आणि घाईत ते तिकीट चिकटवून त्या मुलीकडे दिले.
(हेही वाचा : शिवसेनेचे ‘युवा’ बेजबाबदार)
बाबासाहेबांनी लंडनमध्ये टपाल तिकीट उलटे लावले, आणि…
बाबासाहेब निघतानाच ती मुलगी त्यांना बोलावते आणि म्हणते या तिकिटावर आमच्या राणीचा फोटो आहे आणि तुम्ही हे तिकीट उलटे लावले आहे, आधी ते सरळ करा, बाबासाहेबांनी ते तिकीट सरळ केले आणि त्या मुलीला प्रश्न केला कि, ‘अहो मी पैसे तर तेवढेच दिले होते, मग फरक काय पडतोय, तिकीट उलटे लागो किंवा कसेही आणि जर तुम्हाला न दाखवताच मी ते पत्र टपालपेटीत टाकले असते, तर ते काय पोहोचले नसते का योग्य पत्त्यावर? बाबासाहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना ती मुलगी म्हणाली, माझ्या नकळत ते पत्र पेटीमध्ये गेले असते, तर मी जबाबदार नसते, परंतु माझ्या डोळ्यांदेखत माझ्याच देशाच्या राणीचे डोके उलटे करून तिकीट लागले आहे, हा मी माझ्यासाठी माझ्या राणीचा आणि देशाचा अपमान समजते आणि म्हणून माझ्या डोळ्यादेखत हे होत असताना ते थांबवणे तर माझ्या हातात आहेच.
देशात महापुरुषांना गांभीर्याने घेतली जात नाहीत!
हा किस्सा सांगून बाबासाहेब खंत व्यक्त करतात, बाबासाहेबांचा म्हणतात त्यांच्याकडे त्यांच्या इतिहासाबद्दल, राजाराणींबद्दल, देशाबद्दल किती अभिमान आहे, जागरूकता आहे मग आपल्याकडेच इतिहास आणि ऐतिहासिक मंडळी गांभीर्याने का घेतली जात नाहीत? आपण इतिहासाची टिंगल-टवाळी आणि निंदानालस्ती का करतो? समाजात शिवरायांबद्दल अनेक खोट्या दंतकथा रुजल्या आहेत आणि अशा वेळी सत्य नाही पण दंतकथा लोकांकडे जास्त जलद जातात म्हणूनच देशाला इतिहास संशोधन करणाऱ्या मंडळींची जास्त गरज आहे. आपण आपल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू याच निष्काळजीपणामुळे गमाविल्या आहेत याची बाबासाहेबांना खंत वाटते.
Join Our WhatsApp Community