कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारी सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच, कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावाला भेट देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या नेत्यांची अडवणूक बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जो तह करण्यात आला त्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ फासण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले असून, स्टेज हटवण्यात आला आहे. रविवारी मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता अचानक काम थांबवण्यात आले आहे.
( हेही वाचा: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; एक ठार तर 6 गंभीर जखमी )
…म्हणून नाकारली परवानगी
बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रविंद्र गाडादी म्हणाले, मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यांसदर्भात एकीकरण समितीला पत्रदेखील देण्यात आले. मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community