महाराष्ट्र मिलिटरी स्कूल Maharashtra Military School चे प्राचार्य काशिनाथ भोईर सर यांची मुरबाड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुरबाड येथे शासकीय विश्राम ग्रुहात आज मुरबाड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा पार पडली. या सभेमध्ये मुरबाड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. सदर सभेमध्ये तालुका कार्यकारिणी निवडण्यासाठी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रवीण लोंढे सर व उपाध्यक्ष गणेश पाटील सर उपस्थित होते. सदर सभेचे अध्यक्षस्थान चंद्रकांत पवार यांनी भूषविले. नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे हे सध्या ठाणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदशान्वये मुरबाड तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. प्राचार्य काशिनाथ भोईर सर यापूर्वी २०१७ पासून मुरबाड तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव म्हणून काम पहात होते.
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यातून शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असून आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल Maharashtra Military School चे प्राचार्य काशिनाथ भोईर हे विद्यार्थी आणि शिक्षक प्रिय मुख्याध्यापक असून तालुक्यातील एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. शाळेय प्रशासनातील कामकाजात ते बारकाईने लक्ष देणारे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तसेच शाळेय कामकाजातील दैनंदिन अडचणी आणि शाळांसमोरील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. २०१७ मध्ये ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून सत्कार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी सहभाग घेतला होता. तेथील शाळा आणि महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी हितगुज साधले आहे. जून २०२३ मध्ये, त्यांनी एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त माँरिशस मधील शाळांना भेटी दिल्या असून तेथील शिक्षण व्यवस्थेबद्दल माहिती घेतली आहे.
तसेच, अलिकडेच महाराष्ट्रातील नामांकित अराजकीय संस्था ‘मेस्टा’ ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय प्रतिष्टेचा ‘एक्सलंट प्रिंन्सीपल अवार्ड’ देऊन त्यांचा गौरव केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ते तालुक्यातील सर्व शाळांचे आणि मुख्याध्यापकांचे चांगले प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा आहे. कार्यकारीणीची निवड झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष काशिनाथ भोईर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना संबोधित केले. तर नवनियुक्त सचिव मुख्याध्यापक गोविंद रसाळ यांनी आभार व्यक्त केले. मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चंद्रकांत पवार, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद घोलप, मुख्याध्यापीका मनिषा देसले, मुख्याध्यापक धनाजी खापरे, योगेंद्र वेखंडे, दौलत भावार्थे विद्यासेवक पतपेढीचे संचालक धनाजी दळवी आदी उपस्थित होते.
(हेही वाचा CBSE Board : मुंबईत सीबीएसई मंडळाच्या आणखी ५ ते ६ शाळा वाढणार)
Join Our WhatsApp Community