Monsoon Update: परतीच्या पावसाबद्दल वेधशाळेकडून आली मोठी बातमी

180

मुंबई, पुण्यासह राज्य तसेच देशातील उर्वरित भागांतून परतीचा पाऊस माघारी फिरल्याचे रविवारी भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. साधारणतः १५ ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्वच भागांतून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून नैऋत्य मोसमी वा-यांना देशातून काढता पाय घेताना ऑक्टोबर महिन्याचा तिसरा किंवा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे तसेच ईशान्य मोसमी वारे दाखल होण्याच्या दिवसांतील अंतरही आता कमी होत आहे.

(हेही वाचा – बंगालच्या उपसागरातील वादळाबाबत मोठी बातमी! कुठे असणार वादळाचा रोख?)

देशांत यंदाच्या वर्षांत बराच वेळ मान्सून रेंगाळला होता. महाराष्ट्रात साधारणतः ५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतल्याचे दिसून येते. यंदा राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्रातून मान्सूनला परतीचा मार्ग धरण्यासाठी १३ ऑक्टोबरची तारीख उजाडली. जळगाव आणि डहाणूपर्यंत पाऊस परतल्याचे वेधशाळेने जाहीर केले. परंतु स्थानिक वातावरणातील बाष्पामुळे जळगावात त्यानंतरही पाऊस सुरु होता.

ऑक्टोबरच्या पंधरवड्यापासूनच मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. पुण्यात एका रात्रीत पूरजन्य परिस्थिती निर्माण केली. सांगली, सोलापूरमध्येही आठवडाभर परतीच्या पावसाची हजेरी सुरु होती. शुक्रवारी वेधशाळेने राज्यातील उर्वरित भागांसह मान्सून रविवारपर्यंत परतणार असल्याचा पूर्वानुमान दिला होता. शनिवारी कोकणातील दोन स्थानके वगळता राज्यात कुठेही पाऊस झाला नाही. अखेर रविवारी सकाळच्या अंदाजपत्रात वेधशाळेने देशभरातून मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.