‘लालपरी’ची सेवा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप मागील अडीच महिन्यांपासून सुरू आहे. अजूनही कर्मचारी काही संख्येने संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही कर्मचारी संपावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी बरेच कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. त्यामुळे आता ‘लालपरी’ची सेवा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे.

आठ विभागात 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती

कर्मचाऱ्यांच्या संपाच्या या निर्णयामुळे अद्याप एसटीची वाहतूक ठप्प आहे. दरम्यान कंत्राटी चालकांना रूजू करून एसटीची सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाकडून सुरू आहेत. आज रविवारपासून टप्प्याने एसटीच्या आठ विभागात 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे. सुमारे तीन हजार कंत्राटी चालक नेमणार असल्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे.

(हेही वाचा – आता एसटीचे कर्मचारी मागतायत स्वेच्छा मरणाची परवानगी…)

थेट स्वेच्छा मरणाची इच्छा

दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीवर कोणताही निर्णय होत नसल्याने आता कर्मचा-यांनी थेट स्वेच्छा मरणाची इच्छा प्रकट केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

पाथर्डी आगारातील कर्मचा-यांचे पत्र

राज्य परिवहन विभागाच्या पाथर्डी आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी पाथर्डीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहे, तसेच एसटी कर्मचारीही तणावाखाली आले आहेत. संप काळात 67 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचार्‍यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here