मुंबईतील फेरीवाल्यावर गुंडांची दहशत, हप्तेवसुलीसाठी शस्त्राचा वापर

112
मुंबई शहरासह उपनगरातील फेरीवाल्यांकडून हप्तेवसुलीसाठी गुंडांनी शस्त्राचा वापर करून फेरीवाल्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. वांद्रे आणि सांताक्रूझ येथे नुकत्याच दोन घटना समोर आल्या आहेत. वांद्रे येथील गुंडांनी गोळीबार करून फेरीवाल्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तर सांताक्रूझ येथे काही गुंडांनी फेरीवाल्यांना धमकी देऊन महिन्याला प्रत्येकी १० हजारांच्या हप्त्याची मागणी केली आहे.
मुंबई शहरासह उपनगरात पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली दरमहा शेकडो कोटींची हप्तेवसुली केली जात आहे. या हप्तेवसुलीमध्ये महानगर पालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक नेते गुंतलेले असताना गुंडांनीदेखील या फेरीवालयांना धमकावून हप्ते वसुली सुरू केली आहे. मुंबईतील पदपथावर, रस्त्यावर बस्तान मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांची दररोज शेकडो कोटींची उलाढाल आहे, कुठलाही कर नाही, कुठलेही भाडे न भरता फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत करण्यात आले आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याच्या नावाखाली पोलीस, मनपा प्रशासनाला मोठी रक्कम दिली जात असल्यामुळे हे फेरीवाले राजरोसपणे आपला व्यवसाय रस्त्यावर सुरु ठेवला आहे.

गोळीबार करुन दहशत पसरवतात

पदपथावर अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर गुंड टोळ्यांनी लक्ष केंद्रित केले असून, प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली त्यांनी फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली सुरू केली आहे. त्यापूर्वी या गुंड टोळ्यांनी फेरीवाल्यावर दहशत निर्माण करण्यासाठी फेरीवाल्यांना शस्त्राचा धाक दाखवून, गोळीबार करून दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.

फेरीवाले हप्ते भरुन करताहेत व्यवसाय

वांद्रे पश्चिम लिंकिंग रोड येथे गुरुवारी रात्री झालेला गोळीबार हा त्याचाच एक नमुना होता, मोटारसायकलवरून आलेल्या तीन गुंडांनी हवेत गोळीबार करून फेरीवाल्यांना धमकावले. सांताक्रूझ येथेदेखील काही गुंडांनी फेरीवाल्यांना शस्त्राचा धाक दाखवून दरमहा १० हजार रुपये हप्त्याची मागणी केली आहे. या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठण्यात करण्यात आली आहे. मात्र पोलीस ठाण्यात नोंद न झालेल्या घटना मुंबईत दररोज घडत आहेत. फेरीवाले मात्र पोलीस ठाण्यात तक्रार न करता  मुकाट्याने हप्ते देऊन  व्यवसाय करत असल्याचे, काही फेरीवाले संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.