‘शिवसेना भवन’शेजारी शिंदे गटाचे मुख्यालय?

97

शिवसेनेचे ४० आणि अपक्ष मिळून ५१ आमदारांची मोट बांधत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता ‘शिवसेना भवन’ शेजारीच पक्षाचे मुख्यालय स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दादरमधील काही जागांची पाहणी करण्यात आली असून, शिवसेना भवनपासून अवघ्या १०० मीटरवर असलेल्या एका इमारतीची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: ५ राष्ट्रध्वजानंतर ‘तिरंगा’ झाला फायनल, कोणते होते त्यापूर्वीचे झेंडे?)

दादरस्थित शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे स्फुर्तीस्थान मानले जाते. बाळासाहेबांच्या स्मृतींची साक्ष देणाऱ्या या वास्तूला आवर्जून भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिक येत असतात. आमदार, खासदार आणि पक्षाचे महत्त्वाचे शिलेदार फोडण्यात यश मिळाले असले, तरी शिवसेना भवनाचा ताबा मिळणे कठीण असल्याने, या वास्तूशेजारीच पक्षाचे मुख्यालय स्थापन करावे, असे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचे मत आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयासाठी उपयोगात आणता येईल, अशा जागांची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्यांकडून सुरू आहे.

(हेही वाचा – बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, ‘त्यांना लवकरच…’)

शिवसेना भवनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ‘रुबी टॉवर्स’ या ४० मजली इमारतीत पुरेशी जागा उपलब्ध असून, अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असे पक्ष कार्यालय तेथे निर्माण करता येण्यासारखी स्थिती आहे. नुकतीच शिंदेंच्या सहकाऱ्यांनी या इमारतीची पहाणी केली असून, जवळपास २० हजार चौरस फुटांची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा त्यांचा विचार आहे. या इमारतीत पार्किंसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय सेनापती बापट मार्ग आणि शिवाजी नाट्यमंदिराच्या समोरून ये-जा करण्याची सोय असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादर स्थानकापासून पायी पोहोचता येण्यासारखी स्थिती आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी या जागेची पहाणी केली, की अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दादरचीच निवड का?

– मुख्यमंत्री पदी असताना उद्धव ठाकरे सर्वसामान्य कर्यकर्तेच काय, पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांनाही भेटणे टाळत असत. आता एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर खडबडून जागे झालेले ठाकरे पुन्हा पक्षात सक्रीय झाले आहेत. अलिकडे वरचेवर शिवसेना भवनात येऊन ते कार्यकर्ते, नेत्यांना भेटत असतात. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षविस्तार मोहिमेत खंड पाडण्यासाठी ‘दादर’ हे मध्यवर्ती ठिकाण ठरू शकते.

– शिंदे गटाचे पक्ष कार्यालय हे जनसामान्यांचे असेल. आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीनुसार इथला कारभार चालेल. लोकांच्या प्रत्येक समस्येवर येथे तोडगा असेल. एखादा गरजू व्यक्ती येथून संतुष्ट होऊनच बाहेर पडेल, अशी पक्ष कार्यालयाची रचना करण्याचे एकनाथ शिंदे यांचे स्वप्न असल्याचेही सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.