आरोग्य निर्देशांक अहवाल: केरळ पहिल्या स्थानी, बघा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा!

168

आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह यापूर्वीच्या निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे. आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने सोमवारी देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा ‘सर्वंकष आरोग्य निर्देशांक 2019-20’ (चौथी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल आणि जागतिक बँकेच्या वरिष्ठ आरोग्य विशेषज्ञ शीना छाब्रा यांच्या उपस्थितीत ‘निरोगी राज्य, प्रगतीशील भारत अहवाल’ या शीर्षकाचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवाल प्रसिद्ध झाला.

(हेही वाचा -सुशासन निर्देशांक अहवाल २०२१: देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी)

यापूर्वी 2018-19 च्या आरोग्य निर्देशांकात (तिसरी आवृत्ती) महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता. राज्याने सहाव्या स्थानाहून सुधारणा करत 2019-20 च्या आरोग्य निर्देशांकात (चौथी आवृत्ती) पाचवे स्थान मिळविले आहे. जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने निती आयोगाने 2018-19 च्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात संकलित माहितीच्या आधारावर गुणांकनासाठी देशातील 19 मोठी राज्य, 8 लहान राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेश अशी वर्गवारी करण्यात आली आहे. विविध तीन क्षेत्रांमध्ये एकूण 24 मानकांच्या आधारे 19 मोठ्या राज्यांमध्ये 100 पैकी 82.20 गुण मिळवून केरळ प्रथम स्थानावर कायम आहे तर 69.14 गुणांसह महाराष्ट्राने पाचवे स्थान मिळविले.

बाल मृत्यू दर आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

अहवालात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदरात आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिले आहे. 2015 च्या आधाराभूत माहितीनुसार राज्यात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदराचे प्रमाण 1000 बालकांमागे 24 होते. हे प्रमाण घटून 2019-20च्या आधाराभूत माहितीनुसार 1000 बालकांमागे 22 एवढे झाले आहे. जन्मापासून 28 दिवसांपर्यंतची बालके नवजात बालक म्हणून गणली जातात. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार नवजात बालकांच्या मृत्यूदराचे प्रमाण 1000 बालकांमागे 16 एवढे होते यात घट होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार 1000 बालकांमागे 13 एवढे झाले आहे.

संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ

महाराष्ट्रात संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ झाली असून परिणामी बाल व माता मृत्यूदरात घट झाली आहे. अहवालात नमूद 2015-16 च्या आधारभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण 85.3 टक्के एवढे होते. 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण 91.19 टक्के एवढे वाढल्याचे अहवालात नमूद आहे.

गर्भवती महिलांच्या नोंदणीत वाढ

आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत राज्यात गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण 63.58 टक्के होते यात वाढ होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार नोंदणीचे प्रमाण 85.72 झाले आहे.

जिल्हा वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता लक्षणीय

आरोग्य विभागाच्या योजना व कार्यक्रमांची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक असते. यात महाराष्ट्राची स्थिती सुधारली असून राज्यात 2013-16 च्या आधारभूत माहितीनुसार मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिका-यांच्या स्थिर कालावधीचे प्रमाण 15.6 एवढे होते. 2017-19 च्या आधाराभूत माहितीनुसार हे प्रमाण 18.55 एवढे वाढले आहे. आरोग्य क्षेत्रात राज्य स्तरावरील महत्वाच्या अधिकारी पदाचा स्थिर कालावधीही याच कालवधित 10.58 हून 11.1 झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.