नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून हा महामार्ग प्रवासासाठी कधी खुला होणार याची प्रतिक्षा नागरिकांना होती. मात्र आता प्रतिक्षा संपली असल्याचे सांगितले जात आहे. कारण १५ ऑगस्टपासून नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावरून नागरिकांना प्रवास करता येणार आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावरील वाहतूक १५ ऑगस्टपासून सुरू होणार असून या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या विकासासाठी हा महामार्ग गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
(हेही वाचा – ठाकरे- शिंदे एकत्र येणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…)
महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होणार
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या पूर्वीच्या सरकारने समृद्धी महामार्ग सुरू करण्याची तीन वेळा घोषणा केली होती. प्रत्येक वेळी ती पुढे ढकलण्यात आली. मात्र आता पहिला टप्पा असलेला नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग १५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला होणार आहे. याशिवाय मुंबई-शिर्डी महामार्गाचे इतर काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी मुंबई-नागपूर महामार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
२४ जिल्ह्यांना होणार महामार्गाचा फायदा
विशेष म्हणजे, ३१ जुलै २०१५ रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाची घोषणा केली होती. हा महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांतून जातो, मात्र त्याचा फायदा २४ जिल्ह्यांना होणार आहे. त्यावेळी त्याच्या पूर्णत्वाची प्रस्तावित तारीख ऑक्टोबर २०२१ अशी निश्चित करण्यात आली होती. भूसंपादन, कोरोना लॉकडाऊन अशा अनेक अडचणींमुळे आतापर्यंत नागपूर-शिर्डी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम एकूण १६ टप्प्यात सुरू असून, नागपूर-मुंबई महामार्गावर ७०१ किमी लांबीची एकूण १६९९ छोटी-मोठी बांधकामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यापैकी सुमारे १४०० बांधकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बांधकाम वर्षभरात पूर्ण होणाप असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community