कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणार्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेणार!
येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा मंत्री वर्षा गायकडवाड यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सांगतांना त्या म्हणाल्या, सध्याची परिस्थिती बघता भविष्यातील धोक्यांचाही विचार करून एसओपी नियमांची आखणी केली आहे. वेळेनुसार, त्यात वेळेनुसार आणखी अपडेट्स कऱण्यात येतील. शेवटी मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.
काय आहे प्रस्ताव
पहिली ते बारावीच्या इयत्तांचा यात समावेश असेल. तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनीच परिस्थिती पाहून घ्यावा. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या एसओपी आधी ठरविल्या आहेत, त्या कायम राहणार आहेत, असेही प्रस्तावात म्हटले असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
(हेही वाचा -‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषदे’चे आयोजन!)
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. कोरोना लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.