महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, राघोबादादा पेशवे, माधवराव पेशवे यांसारख्या योद्ध्यांच्या समकालीन चित्रांमधून धोप किंवा फिरंग प्रकारच्या तलवारी पहावयास मिळतात. महाराष्ट्रातील कित्येक प्रमुख ऐतिहासिक घराण्यांनी देखील आपल्या घराण्याची धोप/फिरंग शस्त्र अभिमानाने आजही जपून ठेवलेली आहेत. या माहितीच्या अनुषंगाने ब्रिटिश तलवारी ऐवजी, भारतीय बनावटीच्या धोप अथवा फिरंग प्रकारच्या तलवारी या मानवंदनेसाठी वापरण्याची सुरुवात महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांपासून सुरु झाल्यास हा आपल्या भारतीय शत्र परंपरेचा सन्मान ठरेल अशी भूमिका ‘दगडांच्या देशा…’ या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीची माहिती संस्थेचे किरण शिंदे यांनी दिली.
भारताला स्वतंत्र शस्त्र परंपरा लाभली
शस्त्र हे राष्ट्राच्या एकंदरीत संस्कृतीचे मापक आहे. असे असूनही खंत एका गोष्टीची वाटते की, आजही आपल्या भारत देशाची तीनही सैन्यदले तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस, मानवंदनेसाठी ब्रिटिश बनावटीच्या रॉबर तलवारीचाच वापर करत आहेत. देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे लोटली असताना ब्रिटिशांची परंपरा आजही सुरू असल्याचे हे आणखी एक उदाहरण. म्हणूनच भारताला मोठी आणि स्वतंत्र शस्त्र परंपरा लाभली असताना मानवंदनेसाठी आपण आजही ब्रिटिश परंपरेतील तलवार वापरणे काळानुरुप नक्कीच बदलले पाहिजे. याला पर्याय म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद (UNESCO) चे भारतातील संग्रहालयशास्त्राचे अभ्यासक असणारे सर फिलिप रॉसन यांचे १९६८ साली, भारतीय तलवारी विषयी माहिती देणारे ‘The Indian Sword’ या पुस्तकातील मत विचारार्थ घेण्यासारखे आहे. घोडदळाच्या फिरंग अथवा धोप बनावटीच्या तलवारींना, तसेच खंडा पद्धतीच्या तलवारींना असणाऱ्या मुठी संदर्भात रॉसन यांनी ‘The Hindu Basket Hilt’ ही संज्ञा वापरली आहे. सरळ पात्याच्या व पिपळ्याच्या म्हणजेच तलवारीच्या टोकाकडील रुंद व पसरट झालेल्या पट्टीसा, खडग खंडा या प्रकारातील शस्त्र ही भारतीय परंपरेमध्ये समाविष्ट होतात. भारतीय देवीदेवतांच्या कित्येक मूर्तींमध्ये या प्रकारातील शस्त्र आपणास पाहावयास मिळतात. त्याचेच पुढील सुधारित विस्तारित व आधुनिक रूप म्हणजे ऐतिहासिक धोप (फिरंग) शस्त्र होय. या तलवारीच्या मुठीला हाताच्या बोटांचे संरक्षण व्हावे यासाठी पूर्ण परज व मुठीच्या खाली शस्त्राचा समतोल राखण्यासाठी गज अशी बनावट असते, असे वर्णन यात पुस्तकात केले आहे. कालपरत्वे सुधारणा होत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित होऊन भारतीय नौसेनेच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तसेच आपल्या आणि आपल्या समाजामध्ये जर एखादी गुलामगिरीची खूण दिसल्यास तीही आपण पुसून टाकली पाहिजे, हा आत्मविश्वास पंतप्रधानांनी आपणा सर्वांना दिला आहे. सध्या पूर्वीच्या भारतीय नौदलाच्या चिन्हातील दोन लाल रेषा काढून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार भारतीय नौसेनेच्या नवीन चिन्हामध्ये साकारण्यात आलेला आहे. अश्या प्रकारे उशिरा का असेना पण ब्रिटिश परंपरा आपण झुगारली असून ही घटना आपणा सर्वांसाठीच फारच अभिमानास्पद आहे. याच विषयाला अनुसरुन ब्रिटिश काळापासून आजही सुरू आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community