राज्यात ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढणार तापमान

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. बुधवार, ८ मार्च आणि गुरुवार, ९ मार्च रोजी कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. अंगाची लाहीलाही होत असतानाच ५ ते ८ मार्च दरम्यान राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. परंतु पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मार्च ते मे महिना अति उष्णतेचा 

यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. उर्वरित तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here