महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पेटला असतानाच आता तेलंगणातील काही गावांनी त्यांना वेगळे करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तेलंगणाला लागून असलेल्या १४ गावांनी अशी मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. या गावातील एक घर आहे जे दोन्ही राज्यात आहे.
( हेही वाचा : लग्न करायचे नव्हते म्हणून प्रेयसीवर चाकूने केले ४९ वार; टी-शर्टच्या आधारे पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध)
काय म्हणाले घरमालक?
महाराजगुडा गावातील उत्तम पवार यांचे घर दोन्ही राज्यांमध्ये विभागले गेले आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर दोन्ही राज्यांची सीमा आखली असून तेलंगणा आणि महाराष्ट्र असे लिहिलेले आहे. घराच्या मधोमध दोन्ही राज्यांची सीमा असली तरी यापासून आम्हाला काहीही अडचण नसल्याचे उत्तम पवार यांनी स्पष्ट केले आहे. उत्तम पवार यांच्या घरात एकूण ८ खोल्या आहेत यापैकी ४ खोल्या या तेलंगणात जातात आणि उर्वरित खोल्या महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगितले. घरात १२ ते १३ जण राहत असून घराचे स्वयंपाक घर तेलंगणात आहे.
सीमा निश्चित करण्यासाठी १९६९ मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी आमचे घर दोन्ही राज्यांमध्ये येते हे स्पष्ट झाले होते परंतु यापासून आम्हाला कोणताही त्रास नव्हता आम्ही दोन्हीकडील ग्रामपंचायतीचा कर भरतो आणि तेलंगणा राज्यसरकारच्या अनेक योजनांचा लाभ सुद्धा घेतो असे घरमालक उत्तम पवार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community