देशात साखर उत्पादनाबरोबरच साखर निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. मागील पाच वर्षांत एकूण निर्यातीच्या ४० टक्केहून अधिक साखरेची निर्यात महाराष्ट्रातून झाली आहे. २०२१-२२ या वर्षात देशातून १०० लाख मे.टन साखरेची निर्यात झाली असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ६३ लाख ६९ हजार मे. टन आहे. देशाला ३४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून त्यात राज्याचा वाटा २० हजार कोटींचा आहे. यंदाच्या वर्षीही ५५ लाख मे.टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज आहे.
( हेही वाचा : २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्यांनी स्वतःची घरे भरली; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल )
निर्यातीत मागील वर्षात मोठी वाढ झाली असून २०१७-१८ मध्ये यातून ५१८० कोटीच महसूल मिळाला होता. तो २०२१-२२ मध्ये ३४ हजार कोटींवर गेला आहे.देशातून ११२ लाख टन, तर राज्यातून ६८ लाख टन साखर निर्यात झाली आहे. यातून ३४ हजार कोटींचे परकीय चलन मिळाले. उत्तर प्रदेशाने ११, तर कर्नाटकने १६ लाख मे. टन साखर निर्यात केली. राज्यातील साखर उत्पादन व निर्यातीसाठी बंदराची उपलब्धता यामुळे राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात झाली आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत १ कोटी मे.टन, तर त्यानंतर १२ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. भारत आता साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे.