विधानपरिषदेसाठी सुनिल शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाच्या नावावर शिक्कामोर्तब

72

मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी शिवसेनेच्यावतीने अखेर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटी न ठेवता आपली जागा सोडण्याची तयारी दर्शवली, त्या माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाला पक्षाने पसंती दिल्याची समजते.

रिक्त जागी शिवसेना कुणाला देणार ? 

विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या सदस्यांपैंकी सहा सदस्यांचा कालावधी १ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून मुंबई महापालिकेतून दोन सदस्य निवडून जाणार आहेत. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ते विधान परिषद निवडणुकीत पुन्हा उतरणार नाही. हे स्पष्ट असतानाच त्यांच्यावर शिवसेना सचिव अनिल परब यांच्या विरोधात विरोधकांना मदत केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे रामदास कदम यांचा पत्ता कापला गेला अशाप्रकारचे वृत्त प्रसारीत होत आहे. परंतु रामदास कदम यांच्या विधान परिषदेतील रिक्त जागी शिवसेना कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. या जागेसाठी वरळीतील माजी आमदार व मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई तसेच शिवसेना सरचिटणीस सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. परंतु यापैंकी सुनील शिंदे यांच्या नावाला मातोश्रीने पसंती दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या त्यागाला सर्वच शिवसैनिकांनी सलाम ठोकला

खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आमदारकी लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुनील शिंदे यांनी आपली वरळीतील जागा सोडली होती.परंतु ही जागा सोडताना त्यांनी कोणत्याही प्रकारची अट ठेवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या या त्यागाला सर्वच शिवसैनिकांनी सलाम ठोकला होता. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. शिवसेनेचे अनेक वर्षे शाखाप्रमुखपद भूषवणाऱ्या सुनील शिंदे यांनी २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांधित मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर बेस्ट समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून त्यांनी माजी मंत्री सचिन अहिर यांचा पराभव करत ते आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु नगरसेवक ते आमदार म्हणून वरळी भागांमध्ये आपल्या कामांनी वेगळी छाप पाडणाऱ्या शिंदे यांना आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदार संघ सोडावे लागले. त्यामुळे त्यांनी केलेला हा त्याग मातोश्रीने वाया जाऊ न देता त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेत करून पुन्हा एकदा त्यांना बहुमान प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून घोषणेची औपचारिकता रविवार किंवा सोमवारी केली जाईल, असे समजते.

(हेही वाचा- देशात समान नागरी कायदा लागू करा, उच्च न्यायालयाची सूचना)

शिंदे यांनी नगरसेवकपद भुषवलेले असल्याने या जागेसाठी त्यांचाच नावाचा विचार योग्य असल्याचेही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. तर वरुण सरदेसाई यांना आगामी होणाऱ्या पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेत पाठवले जाणार आहे. त्यामुळे सरदेसाई यांना विधान परिषदेत जाण्याची साठी अजून दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. उत्तर मुंबईतील शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांचा विधान परिषदेतील कालावधीत संपुष्टात आल्यानंतर त्या जागी वरुण सरदेसाई यांच्या नावाचा विचार केला जाईल, असेही शिवसेनेच्या गोटातून ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.