जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी गांधींनी आंदोलन मागे घेणे आणि त्यानंतर ‘यापुढे माझे आंदोलन देशवासीयांच्या विरुद्ध असेल’, असे लिहिणे, तसेच देशवासियांना असहकार आंदोलनाच्या नावाखाली आयकर भरायला न लावणे आणि दुसरीकडे त्याच वेळी नेहरूंनी स्वतः आयकर भरणे आणि स्वतःच्या वडिलांनाही पत्र लिहून आयकर भरण्यास सांगणे, या सर्व घटना खऱ्या अर्थाने मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा माफीनामा होता, जनतेशी विश्वासघात होता, ब्रिटिशांप्रती त्यांची हुजरेगिरी होती, असा घणाघाती हल्ला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी पुराव्यांसह राष्ट्रीय मंचावरून केला.
आजतक या वृत्तवाहिनीच्या ‘अजेंडा आजतक 21’ या कार्यक्रमात ‘वीर सावरकर’, या विषयावर रणजित सावरकर बोलत होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ आणि इतिहासकार चमन लाल हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
जालियनवाला बाग हत्याकांडातील बळी हुतात्मा नाहीत
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधींनी त्यांचे आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर गांधी लिहितात की, ‘यापुढे माझा सत्याग्रह देशवासीयांच्या विरोधात असेल.’ दुसऱ्या दिवशी गांधीनी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकालाही पत्र लिहिले, ज्यात गांधींनी अहमदाबाद येथील जनतेवर ब्रिटीशांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत म्हटले होते की, अहमदाबाद येथील जनतेला ब्रिटीशांच्या विरोधात काहीही बोलण्याचा अधिकार नाही, कारण तेथील जनतेचा ट्रेन उडवण्याचा कट होता आणि त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले होते, त्याविरूद्ध संतापून ब्रिटीशांनी अहमदाबादच्या जनतेवर गोळ्या झाडल्या आहेत. ब्रिटिशांची ती कृती योग्यच होती, तेथील जनतेला मिळालेली शिक्षा योग्य आहे’. हे पत्र प्रसिद्ध झालेले आहे. या पत्रात गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी एक शब्दही लिहिलेला नाही. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर वर्षभरानंतर ६ ऑक्टोबर १९२० रोजी एका सभेत बोलताना गांधी म्हणाले, ‘जालियनवाला बाग हत्याकांडात ठार झालेले स्त्री-पुरुष हे हुतात्मा नाहीत.’ ब्रिटीशांच्या बाजूने गांधींनी मांडलेल्या या भूमिका, हीच खरी गांधींनी ब्रिटीशांकडे मागितलेली एकप्रकारची माफीच होती’, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी वीर सावरकर यांच्या माफीनाम्या बाबत जो वाद उत्पन्न केला जात आहे, त्यावर जोरदार हल्ला केला.
(हेही वाचा वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्नच! फडणवीसांनी खडसावले सेनेला)
गांधी-नेहरूंनी केला जनतेचा विश्वासघात
१९२० मध्ये गांधींनी असहकार आंदोलन पुकारले, त्यात त्यांनी जनतेला आयकर भरू नका, शाळा-महाविद्यालये सोडा, नोकऱ्या करू नका, असे सांगितले होते. त्यामुळे लाखो लोकांनी शाळा-महाविद्यालये सोडली, त्यांचे भवितव्य धोक्यात आले, हजारो नागरिकांनी वकिली सोडली, लाखो लोकांनी आयकर भरला नाही म्हणून त्यांच्या जमिनी जप्त झाल्या, तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरू हे १९२२ मध्ये त्यांच्या वडिलांना पत्रात लिहितात की, ‘मी आयकर भरण्यासाठी बँकेतून कागदपत्रे मागितली आहेत, तुम्हीही आयकर भरावा.’ हा खरा देशाच्या जनतेशी विश्वासघात आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.
‘त्या’ माफीनाम्यांचा खरा अर्थ काय?
वीर सावरकर यांच्या शेवटच्या माफीनाम्यावरून वाद निर्माण केला जात आहे. त्यावर सविस्तर भूमिका मांडताना रणजित सावरकर म्हणाले की, वीर सावरकर त्यांच्या त्या अर्जात ‘आम्हा राजबंदींना विशेष अधिकार मिळत नाही. अन्य देशांमध्ये मात्र राजबंदींना अधिकार देण्यात येत आहेत, यावरून ब्रिटिश शासक हे मानवतावादी नाहीत असेच सावरकरांनी सुचित केले आहे. त्या अर्जात वीर सावरकर यांनी स्वत:ला ‘प्रॉडिगल सन’ अर्थात बिघडलेला मुलगा असे संबोधित केले आहे. हा शब्द बायबलमधील आहे. बायबलमध्ये एका कथेत ‘एक संत दोन मुलांपैकी बिघडलेल्या लहान मुलाला सुधारण्याचे प्रयत्न करत आहे. त्या मुलाला ‘प्रॉडिगल सन’ म्हटले आहे. ब्रिटिश खिश्चन होते, ते बायबलवर विश्वास ठेवत. सावरकर हे उत्तम साहित्यिक होते, वकील होते म्हणून त्यांनी स्वत:साठी हा शब्दप्रयोग केला होता. त्यात सावरकर पुढे असे लिहितात, ‘जर आम्ही तुम्हाला धोकादायक वाटतो, बिघडलेले वाटतो, तर मग आम्हाला सुधारा’. त्याच वेळी सावरकर असेही लिहितात की, ‘जगातील सर्व सिव्हिलाइज्ड देशांमध्ये राजबंदींना चांगली वागणूक दिली जात आहे, पण तुम्ही देत नाही. तुम्ही आम्हाला सामान्य कैद्यांचेही अधिकार देत नाही आणि आम्हाला राजबंद्यांचेही अधिकार देत नाही. या दोन्ही अधिकारापासून वंचित ठेवून आमच्याशी अमानुष वर्तन करत आहात’. त्या अर्जात सावरकर लिहितात, ‘१९०६ सालची परिस्थिती भीषण होती, त्या परिस्थितीमुळे आम्हाला शस्त्र हाती घ्यावे लागले होते. त्याला दुसरा पर्याय नव्हता. आता तुम्ही सुधारणा करत आहात, असे आमच्या लक्षात आले आहे. अशावेळी कुणीही शांतीमार्गाचा अवलंब करेल. प्रत्येक अर्जात वीर सावरकर यांनी ‘जर माझ्या मुक्ततेला तुमचा विरोध असेल, तर अन्य राजबंदींची तरी तुम्ही मुक्तता करा’, अशी भूमिका मांडलेली आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले. सावरकरांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात या अर्जांचा उल्लेख केला आहे. १० वर्षांत त्यांनी अशी ७ पत्रे लिहिली आहेत. त्यात व्यक्तिगत काही लिहिलेले नाही. ती सर्व पत्रे ब्रिटिशांकडून आधी तपासली जात. त्या पत्रांमध्येही सावरकर यांनी त्यांची ब्रिटिशांकडे अर्ज करण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे. म्हणूनच वीर सावरकर यांनी लिहिलेली पत्रे आणि त्यांचे तथाकथित माफ़ीनामे यांचे एकत्र वाचन केले तरच सुस्पष्टता येईल, असेही रणजित सावरकर म्हणाले.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ)
वीर सावरकर ब्रिटीशांना कायम धोकादायक वाटले
वीर सावरकर यांनी कधी माफी मागितली नव्हती. त्यांनी जेवढे अर्ज केले त्याविषयी तत्कालीन गृहमंत्री रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी, ‘सावरकर यांच्या अर्जामध्ये कुठेही खेद वा खंत व्यक्त केलेली आहे’, असे म्हटले आहे. मग ती माफी कशी म्हणता येऊ शकते, असा प्रश्न रणजित सावरकर यांनी उपस्थित केला. रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी असेही लिहिले आहे की, ‘सावरकरांना जर भारतातील कोणत्याही कारागृहात ठेवले, तरी त्यांचे साथीदार त्यांना मुक्त करतील. सावरकर हे धोकादायक आहेत, म्हणून त्यांची शिक्षा संपली, तरी त्यांना पुढेही आयुष्यभर बंदिस्त ठेवले जावे.’ असे रणजित सावरकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community