आचार्य अत्रे कट्टाः ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रेंनी दिला अत्रेंच्या आठवणींना उजाळा

13 जून हा आचार्य अत्रे यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील उद्यान गणेश येथे आचार्य अत्रे समितीतर्फे आचार्य अत्रे कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आचार्य अत्रेंच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू उलगडले.

पत्रकारितेतला हिमालय

शिक्षण, पत्रकारिता, साहित्य आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी आपला ठसा उमटवला आहे. आचार्य अत्रे यांनी जे काम केलं ते अगदी मनापासून केलं आणि त्यामुळेच ते या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकले, असे यावेळी महेश म्हात्रे म्हणाले. सध्या पत्रकारितेचे स्वरुप बदलत चालले आहे. मी स्वतः 20 वर्ष पत्रकारिता करत त्यात अनेक भूमिका बजावल्या आहेत. पण आजही आचार्य अत्रेंकडे पाहिलं की ते पत्रकारितेतील हिमालयाप्रमाणे मला भासतात. त्यांच्या असंख्य अग्रलेखांतून त्यांनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढले त्याचबरोबर चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले. त्यामुळे त्यांच्याइतकी निःपक्षपाती पत्रकारिता आजच्या काळात बघायला मिळणे हे केवळ अशक्य असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ट्रेनच्या तिकीटावरील गाडी नंबरमध्ये दडलंय मोठं रहस्य, लिंकवर क्लिक करुन वाचा)

श्यामची आई हा सर्वोत्कृष्ट चित्रपट

आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या सिनेमाला त्यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. त्यावेळी या सिनेमासोबत त्याकाळचे अनेक सिनेमे हे या पुरस्काराच्या शर्यतीत होते. या पुरस्कारांचं परीक्षण ज्यांनी केलं, त्यांच्यापैकी एकही व्यक्ती ही मराठी सुद्धा नव्हती, तरीसुद्धा या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळून, त्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला. हे केवळ आचार्य अत्रेंच्या भव्य अशा चिकाटीने आणि साने गुरुजींचे विचार मांडण्याच्या त्यांच्या ध्येयासक्तीने हे शक्य झाल्याचं महेश म्हात्रे म्हणाले. त्यामुळे आचार्य अत्रे यांच्या जीवनातील या सर्व पैलूंचा आपण अभ्यास करायला हवा, त्यांचे अग्रलेख, नाटकं हे वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील असेही महेश म्हात्रे यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here