मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या बदलीचे सुरुच असून पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त पदावरून एफ दक्षिण विभागात बदली केलेल्या महेश पाटील यांच्या खांद्यावरच आता करनिर्धारण व संकलन पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून विश्वास मोटे यांच्याकडे करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता.
( हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या मर्जीतील या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांच्या बदल्या)
मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याकडे मागील काही दिवसांपासून एम पश्चिम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. परंतु या अतिरिक्त कार्यभारातून मोटे यांना मुक्त करण्यात आले आहे. मोटे यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार नुकत्याच परळ लालबागच्या एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली झालेल्या महेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांच्याकडे राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कर वसुली मागील एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत सुमारे ५०० कोटी रुपये वसूल झाला आहे. महापालिकेला एकूण ७ हजार कोटी रुपयांचा महसूल वसूल करणे अपेक्षित आहे. त्यापैंकी ५०० कोटी रुपये वसूल झाल्याने आतापर्यंत सुमारे ७.४ टक्के एवढाचा महसूल जमा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या या मालमत्ता कराच्या आकारणीमध्ये दर पाच वर्षांनी वाढ केली जाते. त्यामुळे सन २०२०मध्ये ही वाढ अपेक्षित होती. परंतु कोविडमुळे पहिली दोन वर्षे वाढ न करण्यास सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर २०२२-२३ या कालावधीतही मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे याही वर्षी जुन्याच पध्दतीने मालमत्ता कर आकारला जाणार आहे. या वर्षी मालमत्ता करात वाढ करण्यासाठी जून महिन्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवला होता. परंतु याला मंजुरी न मिळाल्याने महापालिकेच्यावतीने आता जुन्याच पध्दतीने मालमत्ता कर आकारला जाणार असून त्याची देयके आता पाठवली जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जो मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे, तो थकीत बिलाच्या रकमेतून वसूल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community