महिंद्राने मारली बाजी, देशात पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली

महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ या कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७३.४ टक्के इतका बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आणि त्यामुळे ही तिचाकी विद्युत वाहनांच्या उत्पादनामध्ये देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. आर्थिक वर्ष २१पासून या कंपनीने तब्बल २१४ टक्के इतकी वाढ साधली आहे. विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘महिंद्र इलेक्ट्रिक’कडे ‘ट्रिओ ऑटो’, ‘ट्रिओ यारी’, ‘ट्रिओ जोर’, ‘ई-अल्फा मिनी’ आणि ‘ई-अल्फा कार्गो’ अशा तिचाकी विद्युत वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. सादर झाल्यापासून १८ हजारांपेक्षा जास्त विक्रीचा टप्पा पार करणारा, लिथियम आयन बॅटरी असलेला, ‘ट्रिओ’ हा तिचाकी विद्युत वाहनांचा देशातील पहिले प्लॅटफॉर्म आहे.

2023 मध्येही हीच गती कायम ठेवणार

‘महिंद्राच्या’ अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या उत्पादनांनी एकत्रितपणे ४२.७ कोटी किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे आणि ४२ हजार ८३५ मेट्रिक टनपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाचवले आहे.‘महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या ईव्ही फूटप्रिंटचा लक्षणीय विस्तार केला आणि प्रदूषण कमी केले, याचा मला आनंद आहे (अन्यथा २० लाख झाडे लावायला लागली असती). यातून आम्ही सरकारच्या शाश्वत विकासाच्या धोरणाला हातभार लावला आहे. या यशात आमचे सर्व भागधारक सहभागी आहेत. ‘लास्ट माइल मोबिलिटी स्पेस’मध्ये अनेक रोमांचक उत्पादने आणि सोल्यूशन्स सादर करून आर्थिक वर्ष २३ मध्येदेखील ही गती कायम ठेवता येईल, अशी आम्हाला आशा आहे.”

( हेही वाचा: राज ठाकरेंच्या सभेला येणारी गर्दी पैसे देऊन आणली जाणार, चंद्रकांत खैरेंचा आरोप )

…म्हणून वाहनांचा खप वाढला

‘ट्रिओ ऑटो’ ही पॅसेंजर श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आहे. बाजारात तिचा हिस्सा ७०.४ टक्के इतका आहे. ‘ट्रिओ जोर’ मालवाहू विभागात आघाडीवर आहे आणि तिचा बाजारातील हिस्सा ५२.१ टक्के आहे. पेट्रोल / डिझेल / सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या किमती, प्रगत लि-आयन तंत्रज्ञान आणि सरकारची अनुकूल धोरणे यांमुळे या वाहनांचा खप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाहनांमुळे लक्षणीय बचत साध्य होत असल्याने, ग्राहक आमच्या वाहनांना प्राधान्य देतात. विद्युत वाहनांची उच्च स्वरुपाची विश्वासार्हता, आमचे विस्तृत सर्व्हिस नेटवर्क आणि आक्रमक मार्केटिंग व विक्रीचे धोरण यांचाही या यशात हातभार लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here