नंदुरबार जिल्ह्यात चरणमाळ घाटात लक्झरी बस उलटली; १० प्रवासी गंभीर, दोघांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस पलटली. या भीषण अपघातात ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे तर नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाला आहे. बसचालकासह एका १८ महिन्याच्या चिमुरडीचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. तर इतरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचण येत आहेत.

(हेही वाचा – फक्त औरंगाबाद,उस्मानाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्यांचीही बदलली आहेत नावे)

चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी रात्री महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारी खाजगी लक्झरी बस (जीजे 03 डब्ल्यू 9627) पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. नवापूर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत कार्य केले जात आहे. अपघातग्रस्त बसचा चालक गाडीखाली दाबला गेला असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपर्यंत करण्यात येत होता. या अपघातस्थळी मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र या अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नसून पोलीस प्रशासन याचा अधिक तपास करत आहेत.

चरणमाळ घाटात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना सुरूच आहेत. प्रशासनाच्या वतीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here