नागरिकांना पडला ‘निर्बंधांचा’ विसर! रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब ‘रांगा’

78

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना, राज्यात काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येतील असे सांगितले. पण त्यासोबतच राज्यातील निर्बंध हे 15 जूनपर्यंत वाढवण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. पण तरीही 1 जूनपासून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा संवाद ऐकण्यात लोकांची काही गल्लत झाली का, असेच म्हणावे लागेल. पश्चिम द्रुतगती मार्गासह अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.

सकाळपासून ही वाहतूक कोंडी झाली असून, मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे राज्यात अजूनही कडक निर्बंध लागू असल्याचा विसर नागरिकांना पडला की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. जवळपास तीन ते चार तास वाहतुकीचा खोळंबा झाला असल्याचे चित्र आहे.

 

पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबईचे प्रवेशद्वार असणा-या दहिसर चेक नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. तीन तासांपेक्षा अधिक काळ ही कोंडीची परिस्थिती असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कंटाळून लोकांनी आपल्या दोन पायांच्या गाडीने चालत प्रवास करणे पसंत केले. तसेच पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याची सुद्धा तक्रार नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी केली नाकाबंदी

नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे ही कोंडी झाल्याचे नागरिकांनी ट्विटर वरुन सांगितले आहे. तसेच दहिसर चेक नाक्यावर पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे व्यवस्थापन करण्यात आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पोलिसांकडून तपासणी केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

पश्चिम द्रुतगती मार्गावरील या ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मीरा-भाईंदर पासून दहिसर चेक नाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यात रुग्णांना घेऊन जाणा-या रुग्णवाहिकाही अडकल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

map

वसई क्रीक ब्रिजपासून मुंबईकडे जाणा-या पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच मीरा रोड येथील काशिमीरा भागात सुद्धा हीच परिस्थिती पहायला मिळत आहे.

map1

ही गर्दी पाहता नागरिकांना लॉकडाऊनचा विसर पडला की काय, असं म्हणायची आता वेळ आली आहे.

dreameyezz 1399583532364668934 20210601 095811 img4

मुख्यमंत्र्यांनी दिले कडक निर्बंधांचे संकेत

राज्य सरकार ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे जर का असेच चालू राहिले तर पुन्हा निर्बंध कडक करावे लागतील, असे सोमवारी सांगितले. मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत मोठी वाहतूक कोंडी दिसली, ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुक्त संचार केला तर याद राखा, निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मुंबईतील ट्रॅफिक पाहून अचंबित झालो. त्यामुळे जनतेशी संवाद साधताना मी चुकून निर्बंध उठवण्याची घोषणा केली की काय, असे मला वाटले. त्यामुळे मी असे काही बोललो का याची काही जणांकडे चौकशी केली, पण मी तसे काही बोललो नसल्याचे लक्षात आले. मी कोणतेही निर्बंध उठवलेले नाहीत, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. पण रहदारी अशीच वाढली आणि नागरिकांचा मुक्त संचार असाच सुरू राहिला तर निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.