मालाडच्या जंबो कोविड सेंटरला फायर एनओसीच नाही!

146

मुंबईतील जंबो कोविड सेंटरमध्ये आग लागण्याचे प्रकार घडल्यानंतरही नव्याने बांधण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निरोधक यंत्रणाच बसवण्यात आलेली नाही. एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून जंबो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली असली, तरी यापूर्वीचा अनुभव गाठीशी असूनही त्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या मालाड जंबो कोविड सेंटरमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्याचे त्यांना सुचले नाही. त्यामुळे फायर एनओसी अभावी हे केंद्र सुरु करता येत नसून, त्यामुळेच आता अग्निरोधक यंत्रणा बसवण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत.

अग्नि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना आवश्यक

मुंबईत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून अनुक्रमे मालाड आणि कांजूरमार्ग येथील जंबो कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार मालाड येथील २ हजार खाटांचे कोविड सेंटरचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जुलै २०२१ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर या केंद्राचे हस्तांतरण महापालिकेला करण्यात आले. परंतु हे केंद्र सुरु करण्यापूर्वी सर्व आवश्यक गरजा पूर्ण करून अग्निसुरक्षा प्रमाणपत्राची गरज आहे. या केंद्राची निर्मिती करताना त्यामध्ये अग्नि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला हे केंद्र हस्तांतरीत झाल्यानंतर याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे या केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्युत चुंबकीय संवेदक अर्थात इलेक्ट्रो मॅग्नेटीक सेन्सर सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेर कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून यावर सुमारे ८६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी स्टार इलेक्ट्रीक या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

( हेही वाचा : पोयसर नदी मलमुक्त करण्याचा खर्च ४०० कोटींनी वाढला )

ऑक्सिजनचा बॅकअप साठा

मालाड कोविड सेंटरची निर्मिती करताना एमएमआरडीएच्या माध्यमातून २० केएलचे ४ नग असलेले द्रवरुप ऑक्सिजन टँकची व्यवस्था केली आहे. तसेच ७.१ क्युबिक मीटर क्षमतेच्या ३०० नग सिलिंडर स्टँडबाय म्हणूनही बसवण्यात आले आहे. तरीही आपत्कालिन परिस्थितीत आयसीयू रुग्णांसकट २ हजार रुग्णांसाठी ही व्यवस्था पुरेशी नसल्याने आणीबाणीच्या स्थितीत बॅकअप पुरवण्यासाठी ०.२ केएल क्षमतेचे एकूण ४० ड्युरा सिलिंडर बसतील, अशा प्रकारे दोन मॅनिफोल्ड संलग्न उपकरणांसहीत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ८ केएल क्षमतेच्या ऑक्सिजन बॅकअप साठा उपलब्ध होईल असे यांत्रिकी व विद्युत विभागाने स्पष्ट केले. यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले असून याकरता हॉस्पिफिक्स मार्केटिंग या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

( हेही वाचा : गटविमा नाहीच, वैयक्तिक आरोग्य विमाच घ्या! ना १५ हजार, ना २० हजार, बारा हजारच देणार )

( हेही वाचा : पालिकेची विक्रमी कामगिरी! कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण )

अग्निशमन दलाने केली महापालिकेला सूचना

महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमएमआरडीएने हे केंद्र बांधून दिल्यानंतर ते सुरु करण्यापूर्वी फायर एनओसीसाठी पत्रव्यवहार केला. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारची यंत्रणा बसवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार आता हे काम करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. यापूर्वी अशाप्रकारे केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. परंतु दहिसर व नेस्को येथील काही घटना विचारात घेता अग्निशमन दलाने ही सूचना केल्याने त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा : सफाई कामगारांच्या इमारतींना अग्निरोधक यंत्रणा बसवायला महापालिका विसरली )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.