प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम शासकडून हटवण्यात आले आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. परंतु अशाप्रकारचे बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर आहे. याविरोधात तक्रार दाखल करूनही पुरातत्व विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. या गडांवरील अनधिकृत बांधकामाची योग्यवेळी दखल घेतली गेली नाही तर अफझलखानाच्या थडग्याभोवतीच्या बांधकामाप्रमाणे हे प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : ‘प्रतापगड’नंतर पुण्यातील चाकणच्या ‘संग्रामदुर्ग’च्या अतिक्रमणावर हातोडा! )
लोहगडावर अवैध थडगे
पुण्यातील लोहगडावर काही वर्षांपूर्वी अवैध थडगे बांधण्यात आले आणि कोरोनाकाळात या थडग्याभोवती ५ ते ६ फूट उंचीच्या भिंती बांधल्या गेल्या. काही वर्षांपासून या गडावर हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून अवैधरित्या उरुस सुद्धा साजरा केला जात आहे. प्रत्यक्षात पुरातत्व विभागाकडून या गडावर १३ डिसेंबर २०१८ पासून कोणताही धार्मिक विधी करण्याची परवानगी नसतानाही अवैधरित्या उरुस साजरा केला जातो. गडाच्या उत्तरदायींना याविषयी तक्रार देऊनही अद्याप बांधकाम पाडण्यात आलेले नाही.
दुर्गाडी गडावर ईदगाहच्या नावे हिंदूंना प्रवेशबंदी
ईदगाह म्हणजे ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याजी जागा; श्री दुर्गाडी मंदिराच्या मागे असलेली भिंत ईदगाद असल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असून वर्षातून दोनदा येथे नमाज पठण केले जाते. दुर्गाडी गडाच्या अर्ध्या भागात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात आली असून राज्य राखीव दलाचे पोलीस येथे पहाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मुसलमानांनी दावा केलेल्या ईदगाहवर मनोरे सुद्धा नाहीत आणि मौलवींना उभे राहण्यासाठी जागाही नाही. अर्ध्या भागातील प्रवेशबंदीमुळे हिंदू समाज तब्बल ४८ वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावरील दर्ग्याचा अवैध विस्तार
शिवडी गडावर ‘दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह’ या नावाने दर्गा बांधण्यात आला असून याचा आता १ एकर भूमीत अवैध विस्तार करण्यात आला आहे. या परिसरात मुसलमान कुटुंबाचेही वास्तव्य आहे तसेच हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बकऱ्या पाळतात. दर्ग्याभोवती हिरवे ध्वज लावण्यात आले आहेत. याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे.
मलंगगडावरही अतिक्रमण
गेल्या काही वर्षांपासून मुसलमान मलंगगड बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री मलंगगडावर नवनाथांपैकी सात समाध्या आहेत हे नाथपंथीय साधू मलंगबाबा यांचे समाधीस्थान आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या २००४ सालच्या आघाडी सरकारच्या काळात या भूमीला वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित केले आहे. याविरोधात सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारकडे याचिका दिली असून हा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे.
विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात
पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असून सुद्धा विशाळगडावर ६४ अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीकडून सुद्धा विशाळगडावरील रेहानबाबाच्या दर्ग्यासह या गडावरील ६४ अतिक्रमणे अवैध ठरवण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीने ही बांधकामे हटवण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
माहीम गडावर अवैध वस्ती
मुंबईतील माहीम गडावर पूर्णपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. या गडाचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीने बंद करण्यात आले आहे. या गडावर आता मुसलमानांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून काही हिंदूंची घरे सुद्धा आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असूनही या गडावर आता पूर्णपणे अतिक्रमण करण्यात आले आहे.
कुलाबा गडावर अवैध मजार
ता मुंबईतील कुलाबा किल्ल्यावर थेट थडगं बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर येथील शिवप्रेमींनी हे बांधकाम हटवले परंतु पुन्हा तेथे पक्के बांधकाम करून मजार बांधण्यात आली आहे. ‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावरील थडग्याच्या विरोधात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनीही तक्रार केली आहे. परंतु पुरातत्व विभागाकडून यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community