2008 च्या मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीत आणखी एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली आहे. या खटल्यात साक्ष फिरवणारा हा 17 वा साक्षीदार आहे. त्याने न्यायालयात दावा केला की, एटीएसने त्याला अटक करुन बेकायदेशीरपणे कोठडीत डांबले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएसच्या ) नेत्यांची नाव घेण्यास भाग पाडले.आतापर्यंत मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात 220 साक्षीदारांनी साक्ष दिली होती. त्यातील 17 जणांनी आपली साक्ष फिरवली आहे. विशेष म्हणजे, सध्या ज्यांच्यावर खंडणीचे अनेक आरोप होत आहेत ते परमबीर सिंग यांना एटीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
नाव घेण्यास भाग पाडले
मागील महिन्याच्या सुरुवातीला मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत दावा केला होता की, त्याला धमकी देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर आसएसएस नेत्यांची नावे घेण्यास एटीएसने भाग पाडले होते. साक्षीदाराने केलेल्या या दाव्यानंतर, आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी काॅंग्रेस नेत्यांना माफी मागण्यास सांगितले होते.
( हेही वाचा: अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीवर विकास कामे कशी पूर्ण होणार? भाजपची अर्थसंकल्पावर टीका )
असे आहे प्रकरण
29 सप्टेंबर 2008 रोजी मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या नाशिकच्या मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलवर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींमध्ये लोकसभा सदस्य प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, शुदाकर दिवेडी, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे, हे सर्व सध्या जामिनावर बाहेर आहेत.
Join Our WhatsApp Community