ड्रग्सचे व्यसन जडलेल्या एका तरुणाने व्यसनासाठी चक्क एका १० वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला विकण्यासाठी धारावीत घेऊन आला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून २८ वर्षांच्या एकाला अटक करण्यात आली आहे.
शिवशंकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ४ वर्षांपूर्वी शिवशंकर हा धारावीत राहण्यास होता. त्यानंतर तो दिल्ली येथे राहण्यास गेला होता, मनोरमा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत राहणाऱ्या शिवशंकर याला ड्रग्सचे भयंकर व्यसन जडले होते. व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे त्याने त्याचा इमारतीत राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. २५ नोव्हेंबर रोजी मुलाच्या आईने मनोरमा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन मुलाचा शोध सुरु केला असता त्याच इमारतीत राहणारा शिवशंकर हा देखील त्याच दिवसापासून बेपत्ता असल्याचे कळताच पोलिसांनी शिवशंकरचा माहिती काढून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला.
(हेही वाचा परमबीर सिंग आणि वाझेच्या भेटीमुळे ‘ते’ चौघे अडचणीत)
पोलिसांनी त्याला फोन केला असता तो पठाणकोट येथे असल्याचे सांगून फोन बंद केला. पोलिसाना संशय येताच पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला असता शिवशन्कर हा मुंबईतील धारावीत असल्याची माहिती मिळाली. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेऊन आरोपीचे वर्णन आणि माहिती दिली. शाहू नगर पोलिसांनी तात्काळ शिवशंकर याचे लोकेशनवर त्याचा शोध घेतला असता शिवशंकर एक लहान मुलासोबत या ठिकाणी आला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी वेळ दडवता त्याचा शोध घेत असताना शिवशंकर हा माहीम रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याच्या जागेवरच मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून मुलाची सुटका केली.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो मुलाची विक्री करण्यासाठी धारावीत आला होता. येथील कुठल्याही कारखानदाराला मुलाला विकून पैसे घेऊन त्या पैशांनी तो व्यसन पूर्ण करणार होता, अशी माहिती समोर आली. शाहू नगर पोलिसांनी शिवशंकरचा ताबा दिल्ली पोलिसांना देऊन सुटका करण्यात आलेल्या मुलाचा देखील ताबा दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे.