चारित्र्याचा संशयावरून पत्नीवर भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना चेंबूरच्या टिळक नगर येथे घडली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस! )
दीपाली जावळे (३०) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. दीपाली हिचा वरळीच्या बावन चाळ येथे राहणाऱ्या सतीश जावळे (४०) सोबत १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता, व दोघांना ८ वर्षाची मुलगी आहे. मागील काही महिन्यांपासून पती सतीश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होऊन सतीश दिपालीला मारहाण करीत असे. एप्रिल महिन्यात सतीशने दिपालीला मारहाण केल्यामुळे दीपाली चेंबूर टिळक नगर येथे माहेरी निघून आली होती.
गुन्हा दाखल
सतीशने तिला घरी परत येण्यासाठी सांगून देखील ती येत नसल्यामुळे संतापलेल्या सतीशने तिला कायमची अद्दल घडवायची या उद्देशातून रविवारी रात्री सतीश हा त्याचा मित्र स्वप्नील पवार याच्यासोबत टिळक नगर येथे आला. दीपाली रात्री एम.जी. रोड या ठिकाणी आईची वाट पहात उभी असताना सतीशने पाठीमागून येऊन तिला भररस्त्यात मारहाण करून धारदार हत्याराने तिच्या गळ्यावर पोटावर वार करून पळून गेला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी दिपालीला राजवाडी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती सतीश जावळे आणि त्याचा मित्र स्वप्नील पवार या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.