भारतीय समाज हा अतिशय सहिष्णू असून जगभरात विविध क्षेत्रात हा समाज आपला डंका गाजवत आहे. भारतीय वंशाचे अनेक लोक विविध देशात विविध कंपन्यांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये प्रमुख पदावर विराजमान आहेत. आता अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच भारतीय वंशाची महिला न्यायाधीश झाली आहे.
मनप्रीत मोनिका सिंह असं या महिलेचं नाव असून तिने हॅरिस काऊंटी न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली आहे. पहिल्यांदाच एखादी शिख महिला या पदावर विराजमान झाली आहे. मोनिकाने नोव्हेंबर २०२१ मध्ये तिची उमेदवारी जाहीर केली होती. तिने ट्विट करुन सांगितलं की, “आज मी लॉ क्र. ४ येथील हॅरिस काऊंटी सिव्हील काऊंटी कोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी माझी उमेदवारी जाहीत करत आहे आणि मला अभिमानास्पद वाटत आहे.”
मोनिका सिंहचा जन्म अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये झाला आहे. सध्या ती आपल्या पती व मुलांसह बेलेयर येथे राहते. मोनिका सिंहचे वडील १९७० मध्ये अमेरिकेत गेले. मनप्रीत मोनिका सिंहने शपथ घेताना म्हटलं की, “मी ह्यूस्टनचे प्रतिनिधित्व करते म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत आहे” राज्याचे पहिले दक्षिण आशियाचे न्यायाधीश, रवी सॅंडिल या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की समाजासाठी हा एक मोठा क्षण आहे. मनप्रीत केवळ शिखांसाठी राजदूत म्हणून आली नसून ती सर्व रंगांच्या व्यक्तींसाठी राजदूत म्हणून आली आहे.
( हेही वाचा: …आणि नालासोपाराकरांना एसी लोकलने घडवली विरारवारी )
मनप्रीत मोनिका सिंहला २०१० मध्ये ह्यूस्टन यंग लॉयर्स असोसिएशन मोस्ट आऊटस्टॅंडिंग ऍटर्नीसाठी दुसरा क्रमांक मिळाला तसेच २०१७ मध्ये साऊथ एशियन बार असोसिएशनकडून तिला प्रतिष्ठित सदस्य पुरस्कार प्राप्त झाला. गेली २० वर्षे ती वकील म्हणून कार्यरत आहे. तिने १०० हून अधिक खटके हाताळले आहेत आणि असंख्य स्थानिक, राज्यस्तरीय आणि नागरी हक्क संस्थांमधून सक्रियपणे कार्य करीत आहे.
अमेरिकेत ५००,००० शिखांची लोकसंख्या असून ह्यूस्टनमध्ये २० हजार शिख राहतात. त्यामुळे मोनिकाच्या या कर्तृत्वाला महत्वाचं स्थान प्राप्त होतं. तिचं यश केवळ शिख समाजासाठी महत्वाचं नसून संबंध भारतीय समाजाला तिचा अभिमान आहे.