मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ (Mumbai University Convocation) राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ७ जानेवारीला सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे उपस्थित होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी उपस्थित होते.
मानसी करंदीकर हिला विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण
या दीक्षांत समारंभात (Mumbai University Convocation) दरवर्षी विज्ञान क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक’ (Swatantrya Veer Savarkar Memorial Gold Medal) देऊन गौरविण्यात येते. यावर्षी चिपळूण तालुक्यातील चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी करंदीकर हिने एमएस्सी पदवी प्राप्त केली आहे. तिने विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
वीर सावरकरांच्या विचारांवर विकसित भारत घडावा – मानसी करंदीकर
वीर सावरकरांचे विचार हे आपण आपल्या देशात पुढे नेले पाहिजे, त्यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवला पाहिजे, त्यामध्ये माझा सहभाग असला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार माझ्यामध्ये रुजले पाहिजेत आणि मी जे भविष्यात अध्यापन क्षेत्र निवडणार आहे, त्याद्वारे मुलांमध्येही वीर सावरकर यांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी प्रोत्साहन देणार आहे, असे मानसी करंदीकर हिने ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद – राजेंद्र वराडकर
आजच्या विद्यार्थ्यांनी जे काही प्राविण्य मिळवले आहे, उत्तम कामगिरी केली आहे, हे कौतुकास्पद आहे. वीर सावरकर यांनी म्हटले आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रात मोठे नाव कमावले पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या आणि जगाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे, हा संदेश या पुरस्काराच्या माध्यमातून दिला जात आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी म्हटले. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला निमंत्रित केले होते. स्मारकाच्या वतीने राजेंद्र वराडकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे – राज्यपाल राधाकृष्णन
सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे आणि त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या दीक्षान्त समारंभात (Mumbai University Convocation) केली. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारोह आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल. महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, याकडे लक्ष वेधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे ,असे राज्यपालांनी सांगितले. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या संशोधन परिसंस्थेला बळकट करणार – प्रा. अभय करंदीकर
समृद्ध, स्वावलंबी आणि विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची नवकल्पना आणि नेतृत्व महत्त्वाचे असेल यासाठी भारतात संशोधन पूरक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने, नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून भारताच्या संशोधन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी, सहयोगी प्रयत्नांना सुलभ करण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community