वाझेने कळव्यातील दुकानातून खरेदी केले होते ‘ते’ रुमाल!

मनसुखच्या तोंडावर असलेल्या कापडी मास्कच्या आत पोलिसांना ६ हातरुमाल घडी केलेल्या अवस्थेत सापडले होते.

मनसुख हिरेन याच्या तोंडावर असलेल्या मास्कच्या आत सापडलेले हातरुमाल कळवा स्थानकाच्या बाहेरुन ४ मार्च रोजी विकत घेण्यात आले असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. हे हातरुमाल सचिन वाझे याने विकत घेतल्याचे एनआयएच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरुन स्पष्ट होत आहे. तसेच या रुमालांवर कुठल्याही प्रकारच्या द्रव्याचा वापर करण्यात आला नसल्याचा अहवाल कलिना फॉरेन्सिक लॅबने एनआयएला दिला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. त्यानंतर या कारचा मालक मनसुख हिरेन याची ४ मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मनसुख याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता. मनसुखच्या तोंडावर असलेल्या कापडी मास्कच्या आत पोलिसांना ६ हातरुमाल घडी केलेल्या अवस्थेत सापडले होते.

वाझेने खरेदी केले होते रुमाल

४ मार्च रोजी रात्री कळवा स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सचिन वाझे एका दुकानात गेला व तेथून त्याने ६ हातरुमाल विकत घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे. एनआयएने या दुकानदाराचा जबाब देखील नोंदवला आहे.

(हेही वाचाः सचिन वाझेला कोठडीत हवे पेन, पेपर आणि… पुन्हा फोडायचा आहे ‘लेटर बॉम्ब’?)

रुमालात क्लोरोफॉर्म नाही

या गुन्ह्याचा सुरुवातीला तपास करणा-या एटीएसने हे रुमाल ताब्यात घेऊन तपासणीसाठी कलिना येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते. या रुमालामध्ये क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आला असल्याचा संशय तपास यंत्रणेला होता, यासाठी हे रुमाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन याची हत्या हे दोन्ही गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्यामुळे, हे दोन्ही गुन्हे एनआयएकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान कलिना फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालात या रुमालात कुठल्याही प्रकारचे द्रव्य वापरले गेले नसल्याचे म्हटले आहे. मात्र एनआयएने हे रुमाल पुन्हा तपासणीसाठी पुण्यातील केंद्रीय फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत.

लोकल ट्रेनने वाझेने गाठले कळवा स्थानक

मनसुख हिरेनच्या हत्येतील मुख्य आरोपी सचिन वाझे असून ४ मार्च रोजी रात्री सचिन वाझे हा मनसुख हिरेन याला भेटायला गेला असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. ४ मार्च रोजी सायंकाळी सचिन वाझे सीएसटीएम रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेनने कळवा रेल्वे स्थानकावर उतरल्याचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे. या अनुषंगाने एनआयएकडून कळवा स्थानक आणि सीएसटीएम स्थानकावर सचिन वाझेचे चालणे तपासण्यात आले होते.

(हेही वाचाः सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी!)

सुनील मानेच्या घराची झडती

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला पोलिस निरीक्षक सुनील माने याच्या घराची आणि कार्यालयाची रविवारी एनआयएने झडती घेतली आहे. या झडतीत एनआयएकडून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच माने याच्या घराजवळून क्रेटा कार ताब्यात घेण्यात आली. या कारचा नंबर देखील बनावट असल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या क्रेटा कारने सुनील माने हा ठाणे घोडबंदर रोड येथे ४ मार्च रोजी मनसुखला तावडे नावाने फोन करुन भेटायला गेला होता. तसेच सचिन वाझे, सुनील माने आणि विनायक शिंदे हे एकत्र मनसुखला भेटले होते. असा संशय एनआयएला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here