मनसुख हिरेन हत्याकांडात सचिन वाझे मुख्य आरोपी!

मे २०२०मध्ये विनायक शिंदे हा संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आलेला होता. त्यानंतर तो एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे याच्या संपर्कात होता. मनसुख हिरेन प्रकरणात वाझे याने त्याचा वापर केल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

98
मनसुख हिरेन हत्याकांडाच्या तपासाला वेग आला असून एटीएसच्या तपासात रविवारी, २१ मार्च रोजी रात्रीपर्यंत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच या सर्व घटनेच्या मुख्य सूत्रधारापर्यंत एटीएस लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे (५१) आणि क्रिकेट बुकी नरेश गोर (३१) या दोघांना न्यायालयाने ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करीत आहे, या प्रकरणात एटीएसने विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक केली आहे. विनायक शिंदेला लखनभैय्या खोट्या चकमकी प्रकरणी अटक करण्यात आली होती.

विनायक शिंदे हा सचिन वाझेच्या बेकायदेशीर कामात मदत करायचा! 

मे २०२०मध्ये विनायक शिंदे हा संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आलेला होता. त्यानंतर तो एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझेच्या संपर्कात होता. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेनी त्याचा वापर केल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच नरेश गोर हा ठाण्यातील क्रिकेट बुकी असून त्याने ५ बेनामी मोबाईल सिम कार्ड घेऊन सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना दिले होते, अशी माहिती एटीएसने आपल्या परिपत्रकात दिली आहे. तसेच विनायक शिंदे हा सचिन वाझे यांच्या बेकायदेशीर कामात मदत करीत होता अशी माहिती एटीएसने दिली आहे.

बडा मासा एटीएसच्या गळाला लागण्याची शक्यता

एटीएसने मनसुख हिरेन हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी सचिन वाझेला दाखवले असून या कटात आणखी किती जण सामील आहे, तसेच या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल, असेही एटीएसने परिपत्रकात म्हटले आहे. मनसुख हिरेन हत्याकांडाच्या तपासला वेग आला असून आता बडा मासा एटीएसच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना आज ठाण्याच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३० मार्चपर्यंत दोघांना एटीएस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.