विक्रीसाठी ठेवण्यात आलेले शेकडो पाळीव मासे, प्राणी आणि पक्षाचा पिंजऱ्यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी कल्याणच्या रामबाग येथे घडली. या ठिकाणी असलेल्या तीन दुकानांना दुपारी भीषण आग लागली होती, या आगीत या मुक्या प्राणी पक्षी आणि माशाना आपला जीव गमवावा लागला आहे.
असा घडला प्रकार
कल्याण पश्चिमेत असलेल्या रामबाग येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाळीव श्वान, ससे, पक्षामध्ये पोपट, लव्हबर्ड, पाळीव मासे इत्यादी विक्रीची दुकाने आहेत. बुधवारी दुपारी अचानक एका दुकानाला आग लागली. काही क्षणात ही आग वाढत गेली, दुकान मालकांनी पक्षाचे पिंजरे, माश्याचे टँक आणि पाळीव प्राण्यांचे पिंजरे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र भीषण आग आजूबाजूच्या दुकानापर्यत येऊन पोहचली.
(हेही वाचा – काय सांगताय! आता BCCI आणखी होणार मालामाल!)
या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत शेकडो प्राणी,पक्षी आणि माशांचा होरपळून पिंजऱ्यात मृत्यू झाला. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. तर आगीच्या घटनेची नोंद महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात केली आहे. या घटनेची सविस्तर चौकशी पोलीस करत आहेत.