१ एप्रिलपासून सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका! काय महाग आणि काय होणार स्वस्त?

131

चालू आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपणार असून, 1 एप्रिल 2022 पासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 ला सुरुवात होणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून अनेक नियमांत मोठे बदल होणार आहेत. या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. पुढील महिन्यात जीएसटी, एफडी, बँका, कर तसेच इतर नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षापासून पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामुळे सामान्यांपासून श्रीमंतांवरही परिणाम होणार आहेत. दरम्यान 1 एप्रिलपासून काही वस्तू महाग होणार असून काही गोष्टी स्वस्त देखील होणार आहे.

या वस्तू होणार स्वस्त

अर्थसंकल्प 2022 मध्ये अनेक वस्तूंवर सीमा शुल्क, आयात शुल्क तसेच अनेक शुल्क वाढवणे आणि कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे 1 एप्रिलपासून कपडे, चामड्याचे सामान, मोबाइल फोन, चार्जर, हिरे, हिऱ्याचे दागिने, शेतीची अवजारे, पॉलिश केलेले हिरे, विदेशी मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वस्त होणार आहेत.

या वस्तू महागणार 

छत्री, इमिटेशन ज्वेलरी, लाउडस्पिकर, हेडफोन, इअरफोन, सोलर सेल, एक्स रे मशीन, इलेक्ट्रॉनिक खेळणी महाग होणार आहेत.

(हेही वाचा –  शिल्लक कामे लगेच उरका; 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम)

पोस्ट ऑफिस नियम

1 एप्रिल 2022 पासून, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यामध्ये मिळतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रान्सफर केले जातील. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केल्याचा मोठा बदल होणार आहे.

पीएफ खात्यावर कर

सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी, करदात्याने 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याचे कर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक होते. जर ही तारीखदेखील चुकली असेल, तर तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पर्यंत उरकून घ्या. केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू करणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून सध्याचे पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल. नियमांनुसार, ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा लागू केली जात आहे. याच्यापुढील योगदानावरील व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.

अॅक्सिस बँकेच्या नियमांमध्ये बदल

1 एप्रिल 2022 पासून अॅक्सिस बँकेच्या सॅलरी किंवा सेव्हिंग अकाऊंटवरील नियम बदलणार आहेत. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केली आहे. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादा देखील बदलून चार विनामूल्य व्यवहार किंवा 1.5 लाख रुपये केली आहे. 4 एप्रिलपासून 10 लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ

1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. ड्रग प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे, त्यानंतर आता 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढतील.

पॅन-आधार लिंकिंग

31 मार्चपर्यंत तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक न केल्यास, तुमचे पॅन निष्क्रिय होईल आणि तुम्हाला दंड आकारला जाईल. आयकर कायद्याच्या कलम 234H अंतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा दंड 1,000 रुपयांपर्यंत असू शकतो. पॅन कार्ड आधारला लिंक नसल्यास तुमचे डीमॅट आणि खाते देखील बंद होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.