Marathi Bhasha Gaurav Din 2025 : २७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन की मराठी राजभाषा दिन?

74
Marathi Bhasha Gaurav Din 2025 : २७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन की मराठी राजभाषा दिन?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्‍या-खोर्‍यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्गम धीराने केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कधी मागायास दान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्‍या-खोर्‍यातील शिळा

कवी कुसुमाग्रज यांच्या ह्या ओळी. कुसुमाग्रजांना मराठी मातीचा प्रचंड अभिमान वाटत होता. ते मराठीतील खूप मोठे साहित्यिक होते. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेत अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य रचले आहे. त्यांनी अनेक वाक्ये रचली, अनेक नाटके लिहिली. ललित साहित्यातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. नटसम्राट हे त्यांचं नाटक खूप गाजलं. प्रत्येक दशकात विविध कलावंतांनी हे नाटक सादर केलं आहे हे या नाटकाचं वैशिष्ट्य. यावर एक चित्रपटही येऊन गेला, ज्यात नाना पाटेकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आपण ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. (Marathi Bhasha Gaurav Din 2025)

आपल्याकडे नेहमी या दिनावरुन गल्लत केली जाते. हा मराठी राजभाषा दिन आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे. तर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असतो आणि १ मे ला मराठी राजभाषा दिन असतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि १९६४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असेल, असे घोषित केले म्हणून १ मे ला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. (Marathi Bhasha Gaurav Din 2025)

(हेही वाचा – भारतीय संघाचा कर्णधार Rohit Sharma याला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी; व्हिडीओ व्हायरल)

मराठी साहित्य अजरामर करण्यात अनेक साहित्यिकांनी मोलाची कामगिरी केली आहे. विनायक सावरकर, पु. भा. भावे, सुरेश भट, कुसुमाग्रज अशा साहित्यिकांच्या रचना आजही लोकांना भुरळ पाडत आहेत. मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं की ही जगाच्या कल्याणाचे चिंतन करणारी ही भाषा आहे. ज्ञानेश्वर माऊलींवर प्रचंड अन्याय झाला. पण त्यांनी विद्रोह केला नाही, विद्रोही लिखाण केलं नाही तर त्यांनी “दुरितांचे तिमीर जावो” असं म्हटलं. दुष्ट लोकांना नष्ट करण्याऐवजी दुष्ट लोकांचा दुष्टपणा नष्ट व्हावा अशी प्रार्थना केली. जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. तसंच सावरकरांनी साहित्य निर्माण करताना “हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, तू तेचि अर्पिली नव कविता रसाला. लेखाप्रती विषय तूचि अनन्य झाला.” ही भावना मनात ठेवली. आपलं लेखन त्यांनी भारतमातेला अर्पण केलं. माऊलींपासून समर्थ रामदास आणि तुकोबांनी मराठी साहित्याची सेवा केली. मराठी भाषेविषयी आज आपल्याला जो अभिमान वाटतो, ती या संतांची आणि साहित्यिकांची कृपा. (Marathi Bhasha Gaurav Din 2025)

म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात,

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

हे जरी खरं असलं तरी मराठी माती कोणताच अन्याय सहन करत नाही. ज्यावेळी परकीय विस्तारवादी आक्रमणाला सगळे शरण जात होते. तेव्हा मराठी मातीतला एक किशोर मुलगा या अत्याचाराविरुद्ध पेटून उठला. रायरेश्वरासमोर त्या महापुरुषाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यांनी जी व्यापक स्वातंत्र्य चळवळ उभी केली ज्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. ते महापुरुष म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनाही मराठी भाषेची ताकद माहित होती. म्हणून मराठी राजव्यवहार कोश त्यांनी निर्माण केला. (Marathi Bhasha Gaurav Din 2025)

मराठी भाषा आईप्रमाणे मृदू आहे, मावशीप्रमाणे कनवाळू आहे, संतांप्रमाणे दयाळू आहे. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळी हीच भाषा तलवारीसारखी काम करते. म्हणूनच सुरेश भट याच कवितेत पुढे म्हणतात, (Marathi Bhasha Gaurav Din 2025)

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

जय महाराष्ट्र. जय जय मराठी…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.