पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर न्यू जर्सीमधील एका हाॅटेलने ‘मोदीजी थाळी’ तयार केली आहे. या थाळीचं लवकरच अनावरण करण्यात येणार असून हाॅटेलचे मराठी मालक तथा शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी ही थाळी तयार केली आहे. या थाळीचे वैशिष्ट्य आणि मेनू पाहिल्यास यामध्ये भारतीय विविधतेचं दर्शन या थाळीतील पदार्थांवरून होणार आहे. या पदार्थांमध्ये खिचडी, कोथिंबीर वडी, रसगुल्ला, सरसो दा साग, दम आलू कश्मिरी, इडली, ढोकळा, ताक आणि पापड यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी येत्या २१ ते २४ जून या कालावाधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकेच्या संयुक्त सभागृहांसमोर अभिभाषणही करणार आहेत. दुसऱ्यांदा अशा प्रकारे अमेरिकी संसदेसमोर भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींची मोदी भेट घेणार आहेत.
शेफ कुलकर्णी म्हणाले की, ‘भारतीय समुदायाच्या मागणीनुसार आम्ही मोदीजींची खास थाळी बनवली आहे. या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो का साग, दम आलू सब्जी, इडली, कोथिंबीर वडी, ढोकळा, ताक, पापड इत्यादी व्यंजने आहेत.”
(हेही वाचा – बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्याला सतर्कतेचा इशारा, पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक)
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने जेवण उत्कृष्ट असल्याचे सांगितले. एका व्यक्तीने सांगितले की, न्यू जर्सीमध्ये मोदीजी थाळीला पसंती दिली जात आहे. आम्हा सर्वांना ही थाळी खूप आवडली आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी दिल्लीतील एका रेस्टाॅरंटने मोदींना समर्पित थाळी तयार केली होती. या थाळीचं नावच ‘५६ इंच’ असं ठेवण्यात आलं होतं. या थाळीत बरोबर ५६ पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका थाळीची जोरदार चर्चा रंगली आहे. या थाळीचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
भारत सरकारच्या विनंतीवरून अमेरिकेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार या थाळीमध्ये तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यात डॉ. जयशंकर थाळी देखील लाँच करण्याचे नियोजन आहे. कारण भारतीय अमेरिकन लोकांमध्ये जयशंकर लोकप्रिय आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community