Marathi Language : वाचकाचे जीवन समृद्ध करणारे साहित्य!

49
मनसे आयोजित करतेय भव्य पुस्तक प्रदर्शन; Marathi साहित्याचे विराट दर्शन!
  • रश्मी पोतदार

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

अशाच भावना प्रत्येक मराठीप्रेमींच्या मनात असतात. अमृताशीही पैजा जिंकणारी, गोडवा असणारी अशी आपल्या मायमराठीची थोरवी संत ज्ञानेश्वरांनी वर्णिली आहे. साहित्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयापासूनच बडबडगीते, अंगाई यांच्या माध्यमातून प्रत्येक मराठी बालकाला याची ओळख होते. वाचनाची आवड मला साक्षर झाल्यापासूनच लागली. पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसऱ्या इयत्तेत असा प्रवास करताना नवीन वर्षाचे मराठीचे पुस्तक मी अतःपासून इतिपर्यंत वाचून काढत असे. दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत चांदोबा, इसापनिती, पंचतंत्र, बिरबलाच्या गोष्टी, जादू, राक्षस, राजकन्या, रामायण, महाभारत यांसारख्या साहित्याने मनोरंजनाबरोबरच ज्ञानाचे भांडार माझ्यासमोर खुले केले. (Marathi Language)

अशी झाली वाचनाशी गट्टी

थोडे मोठे झाल्यावर साने गुरुजींचे शामची आई, तीन मुले, खडकावरला अंकुर यांसारख्या अविस्मरणीय पुस्तकांनी साहित्याची तोंडओळख होण्यास सुरवात झाली. माध्यमिक शाळेत गेल्यावर क्रमिक पुस्तकांमधून वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, केशवसूत, आचार्य अत्रे, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कथा, कविता, लेख यांनी मराठी भाषेची गहनता, शब्दांचे सामर्थ्य, वाचकांच्या भावनांवर प्रभाव पाडण्याचा आवाका या साऱ्यांशी नव्याने ओळख झाली. (Marathi Language)

अभ्यासाव्यतिरिक्त शाळेच्या वाचनालयातील अनेक पुस्तकांनी मनोरंजनाबरोबरच ज्ञानाची कवाडेही खुली केली. पु. लं. च व्यक्ती आणि वल्ली पूर्वरंग, गुण गाईन आवडी, हसवणूक, असा मी असामी यांसारखी पुस्तके, तसेच अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, बटाट्याची चाळ यांसारखी नाटके म्हणजे हास्य, विनोद, गंभीरता, राजकारण, उपहास, कारुण्य या साऱ्या जीवनरसांची ओळख करून देणारा खजिनाच आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक श्री. वि. स. खांडेकर यांच्या ययाती, क्रौंचवध, अमृतवेल या कादंबऱ्या आजही मला वाचाव्या, असे वाटते.
त्यातील तत्त्वज्ञान कालातीत आहे. तसेच व. पु. काळे यांच्या वपुर्झा, पार्टनर या पुस्तकातील विचारही जीवनातील सत्यतेचा आरसा दाखवतात. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युन्जय’ या कादंबरीचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव पडला. माझ्या त्या वयातील वाचनात आलेली ती सर्वात मोठी कादंबरी तर होतीच; पण इतिहासातील सत्यता देखील इतक्या मनोरंजनात्मक रितीने मांडता येते, याचे ते एक उत्तम उदाहरण आहे, असे मला वाटते. त्यानंतर मी श्रीमानयोगी, छावा, स्वामी, राऊ यांसारख्या कादंबऱ्याही अधिरतेने वाचून काढल्या. (Marathi Language)

(हेही वाचा – फेस रेकग्निशनची कमाल! MahaKumbh मेळ्यात खतरनाक गुंड अडकले कॅमेऱ्याच्या जाळ्यात)

आशयघन नाटकांची मेजवानी

शिवाजी मंदिर नाट्यगृह हे घराजवळच असल्यामुळे नववी-दहावीपासूनच आम्ही मैत्रिणींनी अनेक गाजलेल्या नाटकांचा आस्वाद घेतला. वसंत कानेटकरांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘मत्स्यगंधा’ यांसारखी ऐतिहासिक नाटके, तसेच ‘बेईमान’, ‘प्रेम तुझा रंग कसा ?’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘अखेरचा सवाल’ यांसारख्या सामाजिक नाटकांचा मनावर अमीट ठसा उमटला आहे. वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकाने, तर वयस्कर नागरिकांच्या डोळ्यात नवीन दृष्टिकोनाचे झणझणीत अंजनच घातले. (Marathi Language)

पुढे नोकरी, संसार, मुलं-बाळं यात वाचन जरा मागे पडले. नाटकांना सुद्धा वारंवार हजेरी लावणे जमेनासे झाले. तरीही पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या आजीव सभासदत्वामुळे दर आठ-दहा दिवसांनी घरी तीन पुस्तके यायची. त्यात कमी वेळात वाचता येईल, असे कथासंग्रह, कादंबरी, लेख असत. नवरा त्याच्या आवडीचे राजकारण, आत्मचरित्र, विज्ञानकथा यांसारखी पुस्तके आणायचा. कधी वेळ मिळाला, तर ती पुस्तकेही वाचली जायची. त्यामुळे मला संघर्षातून वर आलेल्या व्यक्तींची आत्मचरित्र वाचण्याची आवड निर्माण झाली. सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’, माधवी देसाई यांचे ‘नाच ग घुमा’, लक्ष्मीबाई टिळकांचे ‘स्मृतिचित्रे’ हे आम्हाला शाळेच्या अभ्यासात होते. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’, अभय बंग यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’, किशोर काळे यांचे ‘कोल्ह्याट्याचे पोर’, सिंधुताई सकपाळ यांचे ‘मी वनवासी’, एपीजे अब्दुल कलाम ‘अग्निपंख’ अशा अनमोल व्यक्तींच्या आयुष्यातील आगळ्या वेगळ्या अनुभवांनी माझ्यासारख्या वाचकांचे विश्व समृद्ध केले. जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. ज्या वेळी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली, तेव्हा अनेकांनी सांगितले, तू आता लिही. लिखाणाकडे जास्त लक्ष दे. इतक्या वर्षात शाळा, महाविद्यालय, ऑफिस यांच्या अंकात लेख, कविता असे थोडे-फार लिहित होते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी माझे भाषण नेहमी मीच लिहित असे आणि नेहमी बक्षीस घेऊनच येत होते. (Marathi Language)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana मध्ये मोठा बदल; ९ लाख महिला ठरणार अपात्र)

आजपर्यंतच्या वाचनाच्या जबरदस्त अनुभवामुळे भाषेचे जे संस्कार माझ्यावर झाले, त्यामुळे आपणही लिहून बघावे, असे मला वाटू लागले. पहिलाच मोठा प्रयत्न म्हणजे चार वर्षांपूर्वी मी ‘लग्नकल्लोळ’ नावाची लग्न, सहजीवन व घटस्फोट या विषयांवर प्रकाश टाकणारी कादंबरी अवघ्या दीड महिन्यात लिहिली. या कादंबरीला राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. या सगळ्याचे श्रेय मी माझ्या चौफेर वाचनाला पर्यायाने मराठी साहित्याला योगदान देणाऱ्या तमाम मराठी साहित्यिकांना देईन. मलाही माझे थोडेतरी योगदान मराठी भाषेसाठी देता आले, तर ते मी माझे परम भाग्य समजेन. (Marathi Language)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.