गिरगावात ‘मराठी नाट्य विश्व’ची निर्मिती; बोध चिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

95

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून याच्या बोधचिन्हाचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे पार पडले.

( हेही वाचा : वीर सावरकरांची साहित्यसंपदा)

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करण्यात येणाऱ्या ‘मराठी नाट्य विश्व’ ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती आणि ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, असे उद्गार काढले.प्रत्येक राज्याचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

New Project 1 29

नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमकं बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारं माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणं हे महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद असल्याचे उद्गार काढले.

तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटके लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणून देखील प्रयत्न व्हायचे. आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱयाचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

थ्रीडी, फोरडी सारख्या नवीन तंत्रज्ञानाद्वारे जुनी नाटके रेकॉर्ड करा!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते, म्हणून प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग प्रभावळकर यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?”. अशी आठवण सांगून थ्रीडी, फोरडी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्र असलेला भूखंड राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यावर स्थित क्रीडा केंद्र इमारत मोडकळीस आल्यामुळे सन २००० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेल्या या केंद्राचा दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने इमारत उभारली जाणार आहे. दोन तळघर, तळमजला आणि त्यावर तीन मजले अशा स्वरूपाची ही इमारत उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या जून महिन्यात इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याचे नियोजन आहे. दुसऱया टप्प्यात नाट्यगृह व संग्रहालयाची अंतर्गत सजावटीची कामे करण्यात येतील. या इमारतीमध्ये सर्व मजल्यांवर मराठी रंगभूमी संग्रहालय असेल. तळमजल्यावर ६०० प्रेक्षक क्षमतेचे मुख्य सभागृह असेल. तर मोकळ्या जागेत १५० प्रेक्षक क्षमतेचा एक खुला रंगमंच देखील असेल. तालीम कक्ष, विश्रामगृह, कलाकार उपहारगृह, अन्य व्यक्तींसाठी उपाहारगृह, १५० क्षमतेचे वाहनतळ, वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह आणि पुरातन वस्तू जतन व संवर्धन कार्यशाळा अशा विविध वैशिष्ट्यांचा या इमारतीमध्ये समावेश असेल, अशी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख व पर्यटकांसाठी नवे आकर्षण अशा दोन्ही स्वरुपात मराठी नाट्य विश्व आगळेवेगळे ठरेल, असे मनोगत ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर व सुबोध भावे यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, महानगरपालिकेच्या उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) महेश कुंटा, नगर अभियंता अतुल पाटील, प्रकल्प सल्लागार शशांक मेहेंदळे, अभिनेत्री तथा वस्तुसंग्रहालय तज्ञ सखी गोखले हे मान्यवर याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते.प्रसिद्ध अभिनेता दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता हांडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.