मेरी क्युरी ही एक अद्भुत महिला होती. ती शास्त्रज्ञ होती. तिचा जन्म पोलंड देशाच्या राजधानीत म्हणजेच वार्सा येथे ७ नोव्हेंबर १८६७ रोजी झाला. तिचे कुटुंब अत्यंत गरीब होते. तिच्या वडिलांचे नाव वल्दिस्लाव होते. ते गणित शिकवायचे. तिच्या आईचे नाव ब्रोनिस्लावा असे होते. तिची आई सुद्धा शिक्षिका होती आणि पियानोवादक देखील होती. लहानपणापासून वडिलांकडून तिला विज्ञानाचे धडे गिरवता आले. (Marie-curie)
जोसेफ, जोफिया, हेलेना ही मेरी क्युरीची भावंडं. तिच्या आईला क्षयरोग झाल्यामुळे तिला आईची सोबत फारशी मिळाली नाही. भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात तिने आपले शिक्षण पूर्ण केले. मेरी क्युरीने रेडियम आणि पोलोनियम या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लावला. विज्ञानाच्या जगतात तिचे योगदान खूपच मोठे आहे. तिने केलेल्या संशोधनामुळे आज अनेक रुग्णांना रोगाशी लढण्यात बळ मिळत आहे.
पहिल्या महायुद्धात जखमींच्या उपचारासाठी तिने एक्स रे म्हणजेच क्ष-किरणे यांचे उपकरण तयार केले. यामुळे रुग्णांवर उपचार करणे सोपे झाले. त्यांना कुठे गोळी लागली आहे हे शोधून काढता आले, त्यांची मोडलेली हाडे पाहता आली. त्यामुळे त्यांचा शोध मानवी जीवनासाठी वरदान ठरला. तिला तिच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
विशेष म्हणजे नोबेल पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर दोन नोबेल पुरस्काराचा मानही तिला लाभला आहे. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक (१९०३), डेव्ही पदक (१९०३), मात्तॉय्ची पदक (१९०४), इलियत क्रेसन पदक (१९०९) आणि रसायनशास्त्रात नोबेल (१९११) इत्याची पुरस्कार मिळवून तिने इतिहासात आपले नाव अजरामर केले.
तिला अप्लास्टिक अनेमिया हा आजार झाला होता. ४ जुलै १९३४ रोजी दीर्घ काळ किरणोत्सर्गी पदार्थांच्या संपर्कात राहिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. मेरी क्युरीच्या पतीचे नाव पियेरे क्युरी आणि मुलीचे नाव आयरिन क्युरी असे होते.
Join Our WhatsApp Community