ऋजुता लुकतुके
मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक, संस्थापक घरी नेमके कसे वागत असतील? एरवी आपल्यावर हुकुम चालवणारे मोठे बॉस घरात काय करत असतील? असं सर्व प्रकारचं कुतुहल आपल्याला मोठ्या आणि यशस्वी उद्योजकांबद्दल नेहमीच असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर ते असं काय करतात, की ज्यामुळे त्यांची कंपनी त्या त्या क्षेत्रात क्रमांक एकची कंपनी बनते, याविषयीही सर्वांना जाणून घ्यायचं असतं.
मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी अलीकडेच फेसबुकच्या ग्राहकांना त्यांच्या दिनचर्येची थोडीबहुत माहिती दिली. ३९ वर्षीय झुकरबर्ग सकाळी आठ वाजता उठतात, मिक्स्ड मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण ते घेतायत आणि टेलर स्विफ्ट यांच्या गाण्यांचे ते चाहते आहेत. आणि ती गाणीही शिकतायत, असं त्यांनी सांगितलं.
(हेही वाचा-Shubman Gill : गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यावर शुभमनची पहिली प्रतिक्रिया )
फेसबुकवर त्यांनी प्रश्नोत्तराचं एक सत्र नुकतंच घेतलं. आणि यात काही खाजगी प्रश्नांची उत्तरंही दिली. ‘सकाळी उठल्या उठल्या मी माझा फोन हातात घेतो. आणि त्यावर फेसबुक खात्यात जाऊन जगात काय घडतंय याची माहिती घेतो. फेसबुकवर काय चाललंय याचीही माहिती घेतो,’ असं झुकरबर्ग एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली दिनचर्या सांगितली होती. ते म्हणाले, ‘मला रात्री जागायला आवडत नाही. त्यामुळे मी सकाळी लवकर आठ वाजता उठतो. आणि तेव्हाच सगळ्या ईमेलना उत्तरं देतो. सगळं सुरळीत सुरू असेल तर कंपनीत कुणी मला ईमेल करत नाही. पण, काहीतरी वेगळं असेल तर ईमेल येतात. त्यामुळे अशा ईमेलना उत्तरं देणं गरजेचं असतं. आणि तेच काम पहिलं उठून करतो.’
ईमेलना उत्तरं देण्यात झुकरबर्ग यांचे काही तास जातात. पण, त्यानंतर कंपनीच्या कार्यालयात जाणंही आवश्यक असल्यामुळे तयार होऊन झुकरबर्ग (Mark Zuckerberg) कार्यालयात जातात. याच प्रश्नोत्तराच्या सत्रात झुकरबर्ग यांनी मिक्स्ड मार्शल आर्ट्स बद्दलही सांगितलं.
‘मला एमएमए खूप आवडतं. माझा इथं खरा कस लागतो. आणि इथं स्पर्धा करायला मला आवडतं,’ असं त्यांनी सांगितलं. त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी अलीकडेच झुकरबर्ग यांना टेलर स्विफ्टची गाणी खूप आवडतात. आणि त्यांचे बोल ते सध्या शिकत असल्याचं सांगितलं होतं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community