सोलापुरातील मौलाना आझाद पाॅलिटेक्निक महाविद्यालयात सामुहिक काॅपीचा धक्कादायक प्रकार मंगळवारी 13 सप्टेंबरला उघडकीस आला. तब्बल 319 विद्यार्थांनी एकाच वेळी सामुहिक काॅपी केली. आता या प्रकरणात मुंबई स्थित महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने कारवाई केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
ज्या 319 विद्यार्थ्यांनी सामूहिक काॅपी केली ते विद्यार्थी सिव्हिल शाखेच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना नापास करुन त्यांना डिबार करत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत.
( हेही वाचा: औरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना धक्का, सत्तारांच्या आदेशाला दिली स्थगिती )
…तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करु
आम्ही परीक्षेत कोणत्याही प्रकारची काॅपी केली नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या काॅपी प्रकरणात आता प्रहार जनशक्ती संघटनेनेदेखील उडी घेतली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसोबत सोलापूरहून मुंबईला जाऊन तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यालयात घुसणार आहोत. तरीही विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन किंवा वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community