दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव! 39 गाड्या घटनास्थळी रवाना

अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या घटनास्थळी

देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आग लागण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील करोलबाग येथील गफ्फार मार्केट परिसरात भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 39 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,  रविवारी सकाळपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 45 गाड्या घटनास्थळी असल्याची माहिती उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी असेही सांगितले की, अद्याप जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही.

(हेही वाचा – राणीच्या बागेत पाहायला मिळणार कलरफूल लहान-मोठे मासे)

अग्निशमनच्या 39 गाड्या घटनास्थळी रवाना

आग आटोक्यात आल्यानंतर कुलिंग ऑपरेशन आणि त्यानंतर शोधमोहीम हाती घेतली जाईल, असे उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, गफ्फार मार्केटमध्ये रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सकाळी 4:16 वाजता गफ्फार मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला फोनवरून मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ 39 गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. अग्निशमन दलाच्या मते, जिथे आग लागली तिथे सुदैवाने एकही नागरिक अडकलेला नाही. गफ्फार मार्केट परिसरातील शू मार्केटजवळ ही आग लागली आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

ही आगी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गफ्फार मार्केटजवळील शू मार्केटमधील इमारतीतून धूर निघताना दिसल्याचे सांगण्यात आले. तर आग लागताच काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले. इमारतीतून धूराचे लोट पसरू लागले. लोकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती देऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या स्तरावरून प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here