‘या’ वादळामुळे होऊ शकते तुमचे इंटरनेट बंद

96

वादळे आणि त्यामुळे होणारे नुकसान यांच्याबाबत आपण अनेक बातम्या वाचल्या आहेत. काहीवेळा आपणही त्या भीषण परिस्थितीचा सामना केला असेल. पण यापेक्षाही भीषण अशा वादळाची सध्या चर्चा आहे ते म्हणजे सौर वादळ. या वादळाचा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे सौर वादळ?

सौर वादळ ही एक दुर्मिळ घटना आहे. सौर वादळाचा पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो. सौर वादळात सूर्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जाते. या सौर वादळात ऊर्जेच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. याआधी अशाप्रकारचे सौरवादळ 1859 मध्ये आले होते. त्या घटनेला कॅरिंग्टन इव्हेन्ट असं नाव देण्यात आलं होतं. या वादळामुळे इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले होते. अशाच एका वादळाची नोंद 1992 मध्ये सुद्धा करण्यात आली होती. परंतु, हे वादळ सौम्य स्वरुपाचे होते. आता ब्लॅक स्वॅन इव्हेन्ट या सौर वादळाची शक्यता वर्तवली जात आहे.

असा होऊ शकतो परिणाम

हे या दशकात येणारे एक मोठ्या स्वरुपाचे वादळ ठरू शकते, असे त्याचा अभ्यास करणा-या संगीता अब्दुज्योती यांनी स्पष्ट केले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ येथील संगीता अब्दुज्योती यांनी केलेल्या अभ्यासानुसार, पुढील दशकात एक मोठे सौर वादळ पृथ्वीवर धडकू शकते आणि ते घडण्याची शक्यता 1.6-12 टक्के आहे. या वादळामुळे इंटरनेटवर मुख्यतः समुद्राखालील इंटरनेटवर आणि पायाभूत सुविधा जसे की गॅस पाइपलाईन यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. सूर्याकडून पृथ्वीच्या दिशेने चुंबकीय कण बाहेर टाकल्याने पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रे अत्यंत अनियमित होऊन शक्तिशाली विद्युत प्रवाहांना खंडित करू शकतात. या प्रवाहांमध्ये समुद्राखालून असलेल्या लांब पल्ल्याच्या इंटरनेट केबल्स नष्ट करण्याची क्षमता आहे. या केबल्स जगभरात वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटचा कणा म्हणून काम करतात. त्यामुळे याचा गंभीर परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो.

इतके होऊ शकते नुकसान

आज संपूर्ण जग हे इंटरनेटवर अवलंबून आहे. अभ्यासानुसार, सर्वात कमी प्रभावित खंड आशिया असेल, कारण सिंगापूरमध्ये या खंडाचे इंटरनेट केंद्र आहे. असा अंदाज आहे की या सौर वादळाच्या घटनेत अमेरिकेसारख्या देशांना इंटरनेटशिवाय दररोज 7 अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.