मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे महापौरांसह नगरसेवकांचाही कालावधी संपुष्टात आला. परंतु महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतरही मुंबईच्या महापौरांनी भायखळा येथील महापौर निवास सोडलेले नाही. महापौर आजही महापौर निवास अडवून बसल्या असून महापौरपद गेले तरी त्यांना महापौर निवास सोडण्याची इच्छा होत नाही.
मुंबईच्या यापूर्वीचे विश्वनाथ महाडेश्वर यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर २९ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महापौर म्हणून किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर म्हणून ऍड सुहास वाडकर म्हणून निवडून आले होते. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा राणीबागेतील महापौर निवासाचा ताबा घेतला. त्यानंतर कोविड काळ सुरु झाला आणि महापौरांनी या निवासस्थानातून या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर मागील डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांचे कामकाज या महापौर निवासातून चालले होते. पुढे त्यांनी महापौर कार्यालयाचा गाढा मुख्यालय इमारतीतील कार्यालयातून चालवला.
महापौर निवासाचा ताबा अद्यापही पेडणेकरांकडे
परंतु मागील ७ मार्च रोजी नगरसेवक पदासह महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आला. परंतु किशोरी पेडणेकर यांनी अद्यापही भायखळा येथील निवासस्थान सोडलेले नाही. महापौर निवासाचा ताबा अद्यापही पेडणेकर यांच्याकडे असून एका बाजुला निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने घराचा ताबा सोडला नाही, तर त्यांची रक्कम अडवून ठेवली जाते किंवा त्यांना दंड आकारला जातो. परंतु महापौर आजही निवासस्थानाचा ताबा सोडायला तयार नसून तब्बल दीड महिना उलटत आला तरी त्या महापौर निवासस्थानातच राहत आहे.
(हेही वाचा – SBI म्हणते ‘या’ मोबाईल नंबरवरून फोन आला तर उचलू नका; नाहीतर…)
… त्यामुळे राहण्यास परवानगी
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढवून देण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्या घराचे नुतनीकरण सुरु असल्याने त्यांनी मुदतवाढ मागितली आहे, त्यामुळे त्यांना ३० एप्रिलपर्यंत या निवासात राहण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले.