मुंबईतील कोविडचा आजार जवळपास नियंत्रणात यायला लागल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून जनजीवन सुरळीत होऊ लागले. महापालिकेच्या सर्व बैठका व सभा नियमित होऊ लागल्या. सर्व समित्यांचे अध्यक्ष आपापल्या दालनात बसून कामकाज करत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची मात्र मुख्यालयातील दालनाकडे पाठ फिरवली आहे. आजही महापौर राणीबाग येथील निवासस्थानात असलेल्या कार्यालयातुनच कारभार करत असून मुख्यालयातील कार्यालयात त्यांची हजेरी कमीच लागली जाते. त्यामुळे मुख्य कार्यालयाचा मुक्काम पोस्ट नक्की काय? महापालिका मुख्यालय इमारत की राणीबाग निवासस्थान असा प्रश्न त्यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना पडला आहे. कोविडच्या काळात तात्पुरती व्यवस्था म्हणून महापौरांनी निवासस्थानावरील कार्यालयाची व्यवस्था उपलब्ध असली तरी कोविडचा आजार नियंत्रणात आल्यानंतरही महापौर मुख्य कार्यलयाचा वापर करण्यास तयार नसल्याने आपली कैफियत घेऊन येणारे नागरिक महापौरांची भेट होत नसल्याने निराश होऊन परतत आहेत.
राणीबाग निवासस्थान कार्यालयातून कामकाज
मुंबईत मार्च २०२० ला कोविडची लाट आल्यानंतर सुरक्षेची उपाययोजना म्हणून मुख्यालय येथील कार्यलयाऐवजी भायखळा राणीबाग येथील निवासस्थान महापौरांना कार्यालय म्हणून उपलब्ध करून देण्यात आले होते. तेव्हा पासून ते आजतागायत महापौर या कोविडच्या नावाखाली त्याच कार्यालयातुन कारभार हाकत आहेत. कोविड काळात ही तात्पुरती व्यवस्था असली तरी महापौरांनी या कार्यालयाचा वापर कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ करण्यास अधिक प्राधान्य दिले आहे. कोविड काळात ऑनलाईन महापालिका सभा ही राणीबाग येथील महापौर निवासस्थानातील कार्यालयातून घेतल्या जात होत्या. यासाठी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह महापालिकेतील आणि गटनेते तिथे जात असत. मात्र, त्यांनी कधीही त्याला हरकत घेतली नव्हती.
महापौरांनी कोविड नंतर पुन्हा मुख्यालयातील कार्यालयातून कारभार करणे आवश्यक आहे. पण महापौरांना मुख्यालयातील कार्यालयातुन कायमस्वरूपी कामकाज करण्यास तेवढा उत्साह दिसत नाही. त्यामुळे आजही ते राणीबाग येथील निवासस्थानातील कार्यालयातून कामकाज करत आहे. त्यामुळे राणीबागेतील कार्यालयातील वावर अधिक असून मुख्यालयातील कार्यलयात त्यांची हजेरी तुरळक लागते. त्यामुळे मुख्यालयातील कार्यालयात दरदिवशी भेटावयास येणाऱ्या नागरिकांना निराश होत माघारी फिरावे लागते.
( हेही वाचा : काय सांगताय! पेट्रोल शंभरीपार तरीही महाराष्ट्रात विक्री बेसुमार… )
नागरिकांची गैरसोय
महापालिका मुख्यालयात आधीच कर्मचाऱ्यांना बसण्यास जागा नाही. त्यातच महापौर या कार्यालयात येत नसल्याने त्यांचे अधिकृत कार्यालय राणीबागेत केले जावे, किमान त्यांना भेटण्यास येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना निराश होऊन परत जावे लागणार नाही, अशीच प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. महापौर आजही कोविडचा नावाखाली भेट देत नाही आणि दुसरीकडे सर्व ठिकाणी भेटी देत आहेत, त्यामुळे ही कोविड भीती नक्की कशाची असाही सवाल या भेटायवास येणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community