राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमांमध्ये गुणवत्तेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये जे विद्यार्थी मेडिकलला प्रवेश घेतील त्यांना सुरुवातीलाच महर्षि चरक शपथ घ्यावी लागणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांना एक गाव निवडावे लागणार आहे, ते गाव निवडल्यानंतर त्यांना ते गावं दत्तक घ्यावे लागणार आहे. हाच मोठा बदल एमबीबीएसच्या कोर्समध्ये करण्यात येत आहे.
गावागावात वैद्यकीय सुविधा मिळणार
या बदलानुसार छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये काम करण्यास उत्सुक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ते सक्तीने करावेच लागणार आहे. यामुळे गावागावात वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या परिपत्रकानुसार वैद्यकीय शिक्षण जेव्हा सुरु होईल तेव्हा ही शपथ दिली जाणार आहे. संज्ञानात्मक, प्रभावशाली आणि मनोप्रेरणा ही उद्दीष्टे यात समाविष्ट केली जाणार आहेत.
(हेही वाचा – गिरगाव चौपाटीवरील प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम नियमांना डावलून: भाजपने दिला आयुक्तांना इशारा)
नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश
ऑगस्ट 2019 मध्ये सादर करण्यात आलेला नवीन अभ्यासक्रम वैद्यकीय विद्यार्थ्यांना एक मजबूत पाया आणि सर्वांगीण पैलूंकडे संतुलित दृष्टिकोन देणार आहे. यामध्ये, फाऊंडेशन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कुटुंब दत्तक कार्यक्रम, योग, ध्यान आणि स्थानिक भाषा शिकणे समाविष्ट आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या परिपत्रकानुसार जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही तेच गाव दत्तक घेता येईल. FAIMA डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहन कृष्णन यांनी असे सांगितले की, अभ्यासक्रमाच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. फिल्ड व्हिजिटचे प्रशिक्षण तिसऱ्या वर्षी दिले होते, आता ते पहिल्या वर्षीच दिले जाणार आहे.