सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे सोपवल्यानंतर तपासात ‘ड्रग्स’चा अँगल समोर आला. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात घेतले जाते हे काही नवीन नाही. बॉलिवूड कलाकार फरदीन खानपासून ते संजय दत्त आणि “बॅटमॅन” बेन ऍफ्लेक ते “आयर्नमॅन” रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर अशी अनेक प्रकरणे यापूर्वी उजेडात आली आहेत. सध्या गोवा येथील सोनाली फागोट हत्याकांड देशभरात गाजत आहे. सोनाली फागोटला ड्रग्सचा ओव्हरडोस देण्यात आला त्यात तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोनाली फागोट हत्याकांडात ड्रग्जचा वापर समोर आल्यानंतर देशात ड्रग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणानंतर केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी)ने मुंबईसह राज्यभरात छापेमारी करून ड्रग्ज माफियांसह बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणारे त्याचबरोबर ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत कोट्यवधींचा वेगवेगळ्या प्रकारचा ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. मागील काही महिन्यांत मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकानेदेखील मुंबईसह राज्यभरात तसेच राज्याच्या बाहेरून हजारो किलो ड्रग्ज जप्त केले.
…म्हणून या ड्रग्जची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री
भारतात सध्या गांजा आणि मफेड्रोन (एमडी) या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन ड्रग्जने मुंबईसह संपूर्ण देशभरात धुमाकूळ उडवून दिला आहे. बॉलिवूड रेव्ह पार्ट्या, डिस्को पब इत्यादी ठिकाणी मफेड्रोन हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एकेकाळी पार्टी ड्रग्जमध्ये एलएसडी डॉट पेपर,हेरॉईन, कोकेन,हशिस आणि ब्राऊन शुगर इत्यादी ड्रग्जचा समावेश होता. या पार्टी ड्रग्जला ‘एमडी आणि ‘अफगाणी गांजा’ ने मागे टाकले असून, पार्ट्यांमध्ये दोन ड्रग्जने आपली जागा पटकावली आहे. एमडी हा भारतात तयार होणारा ड्रग्ज असून तो तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होत असल्यामुळे स्वस्त असल्याने या एमडीला मोठी मागणी आहे. तसेच गांजाची शेती असल्यामुळे त्यात कुठल्याही केमिकलचा वापर होत नसल्यामुळे, तसचे हे दोन्ही ड्रग्स इतर महागड्या ड्रग्जप्रमाणेच नशा देत असल्यामुळे या दोन ड्रग्सची मागणी भारतातच नाही तर परदेशातदेखील असल्याची माहिती मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली.
मुंबईत अफगाणी गांजाला मोठी मागणी असून, या अफगाणी गांजाची भारतात बेकायदेशीर शेती केली जाते. मुंबईत गांजा ची तस्करी करण्यासाठी ड्रग्ज माफियाकडून अनेक शक्कल लढवली गेली आहे. कधी साधे गवत म्हणून हे आणले जाते, तर कधी चोरट्या मार्गाने गांजाची तस्करी केली जात आहे. तर एमडी व इतर ड्रग्ज आणण्यासाठी महिला तसेच विशिष्ट प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात आहे. कुरियर कंपनीमार्फतदेखील हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात मुंबईत आणले जातात. रस्ते, विमानतळ, तसेच मुंबईतील बंदरात जहाजातून हे ड्रग्ज आणले जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नलावडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये जागृतता मोहिम राबवली जातेय
अफगाणी ड्रग्ज मुंबईत आल्यानंतर अनेक दिवस हे पार्सल मुंबईतील बंदरातून सोडवले जात नाही. काही आठवडे महिने उलटल्यानंतर पकडल्या जाण्याची भीती नसल्याचे बघून हे ड्रग्ज विशिष्ट प्रकारच्या वाहनातून पुरवठादारापर्यंत पोहचवले जाते. तेथून हे ड्रग्ज किरकोळ विक्रेत्यांपर्यत पोहचवले जातात. हे ड्रग्ज्स बॉलिवूड, उच्छभ्रूंच्या पार्ट्या तसेच डिस्को पब मध्ये पुरवले जातात. काॅलेज, झोपड्यांमध्ये या ड्रग्जचे किरकोळ ग्राहक असले तरी या ठिकाणी त्यांची मागणी मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आम्ही प्रत्येक वेळी काॅलेजसमध्ये ड्रग्ज विरोधी मोहीम राबवून त्याच्या दुष्परिणामाची माहिती विद्यार्थ्यांना देत असतो, ड्रग्जमुळे होणाऱ्या हानीबाबत जागृतता केली जाते असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय टोळ्या मोठ्या प्रमाणात असून आफ्रिकन, नायजेरियन टोळ्या ड्रग्ज तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात असून ड्रग्ज भारतात आणण्यासाठी तसेच भारतातून बाहेर घेऊन जाण्यासाठी आफ्रिकन महिलांचा वापर केला जातो. ड्रग्ज चे कॅप्सूल तयार करून शरीरात अथवा अंतरवस्त्रात हे ड्रग्ज लपवून आणले जाते. कुरिअर कंपन्यांचा वापरदेखील ड्रग्ज तस्करीसाठी केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त नलावडे यांनी सांगितले.
राज्यात तसेच परराज्यात एमडी या ड्रग्जचे मोठे कारखाने आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, पालघर जिल्हा, कोल्हापूर, पुणे, रायगड तसेच दिव दमन, गुजरात या राज्यात या ठिकाणी एमडीचे कारखाने असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एमडी तयार करून देशभरात त्याचा पुरवठा केला जात आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही महिन्यात अंबरनाथ, पालघर गुजरात दमन या ठिकाणी असलेले एमडीचे कारखाने उध्वस्त केले आहेत. येथून अमली पदार्थविरोधी पथकाने हजारो किलो एमडी जप्त केले या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटींची किंमत आहे.
एकट्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील ८ महिन्यांत १६५ गुन्हे दाखल करून १ हजार ९१३ किलो ४०८ ग्राम ड्रग्ज जप्त केला आहे. ज्यामध्ये गांजा ६७३ किलो, एमडी १ हजार २२८ किलो जप्त केला असून इतर ड्रग्जपेक्षा गांजा आणि एमडी कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस ठाणे पातळीवर मागील आठ महिन्यांत ५४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७३२ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community