राज्यात गोवरबाधित रुग्णांची संख्या आता ८३६ वर पोहोचली आहे. राज्यभरातील संशयित गोवरची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार २४८ पर्यंत पोहोचल्यानंतर राज्यात सर्वत्र गोवरचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १०१ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे.
(हेही वाचा – ‘त्या’ विधानावर ‘मनसे’ आक्रमक, सुषमा अंधारेंची ‘महाप्रबोधन’ सभा उधळून लावणार!)
सध्या मुंबईत १७ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. महिन्याभरात गोवरचा वेगाने होणारा प्रसार पाहता सर्व स्थानिक संस्थानी स्वतःहून गोवरचा फैलाव कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचा मुद्दा गोवर टास्क फोर्सचे अध्यक्ष सुभाष साळुंखे यांनी उपस्थित केला. सद्यस्थितीत मुंबईत गोवरचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. मुंबईत गोवरचे ४१२ रुग्ण आहेत. गोवरचा वाढता संसर्ग ध्यानात घेता केवळ मुंबई महानगरपालिकेने गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्यास सुरुवात केल्याचे मत साळुंखे यांनी व्यक्त केले. राज्यातील इतर भागांत गोवर प्रतिबंधासाठी केंद्राने दिलेल्या सूचनांचे पालन तातडीने व्हायला हवे, पालिका आयुक्तांनी तसेच जिल्हाधिकारी पातळीवरही गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यान्वित व्हायला हव्यात, असे मत साळुंखे यांनी व्यक्त केले.
- गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत सर्वेक्षण पथके – १ हजार २०१
- सर्वेक्षण करण्यात आलेली घरे – १३ लाख ६७ हजार ३६३
- व्हिटॅमिन ए ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ३३ हजार ६२६
- गोवर रुबेला पहिला डोस देण्यात आलेल्या बालकांची संख्या – १३ हजार ६६८
- गोवर रुबेला दुसरी मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ८ हजार ८५०