मॅकेनिकल इंजिनियर तरुण एटीएसच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय

कुर्ला पश्चिम येथून दहशतवाद विरोधी पथकाने एका संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. मॅकेनिकल इंजिनियर असलेला हा तरुण जम्मू काश्मीर येथील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दहशतवाद पथकाने कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर एमआयजी कॉलनी, येथील इमारत क्रमांक १ मधील एका खोलीत शनिवारी पहाटे छापा टाकून २६ वर्षाच्या मॅकेनिकल इंजिनियर तरुणाला ताब्यात घेतले आहे. पहाटे ५ते ६ वाजण्याच्या दरम्यान एटीएसचा मोठा फौजफाटा कुर्ला विनोबा भावे नगर परिसरात धडकला व काही कळण्याच्या आता या तरुणाला ताब्यात घेऊन या तरुणाच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि काही महत्वाचे डिव्हाईस तपासणीसाठी ताब्यात घेतले गेले.

संशयित तरुण एटीएसच्या ताब्यात

एटीएसच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन महिन्यापूर्वीच हे कुटुंब एमआयजी कॉलनी या ठिकाणी भाड्याच्या घरात राहण्यास आले होते. या तरुणाचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी भाडेतत्वावर एकत्र राहण्यास राहत होते, या घराचा मूळ मालक कोल्हापूर येथे राहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा तरुण जम्मू व काश्मीर येथील काही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, त्याच्याकडे काही संशयित डिव्हाईस सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती एटीएस सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा : गृहिणींचे बजेट कोलमडणार! दुधाच्या किंमतीत १ ऑगस्टपासून वाढ)

ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा दहशतवादी संघटनेतील एका बड्या व्यक्तिच्या संपर्कात होता व या तरुणाच्या मार्फत मुंबईत घातपात करण्याचा मोठा कट शिजत असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. कुर्ला पाईपरोड पूर्वी सिमीचा बालेकिला होता, बंदी आणलेल्या सिमी या संघटनेचे मुख्य कार्यालय पाईपरोड परिसरात होते. मुंबई गुन्हे शाखा, एटीएसने सिमीच्या या बालेकिल्ल्यातून दीड दशकांपूर्वी सिमी संघटनेचे कार्यकर्ते आणि त्याच्या नेत्यांना अटक केली होती, तसेच सिमी संघटनेच्या कार्यालयाला सील केले होते. पोलिसांच्या या कारवाईनंतर कुर्ला पाईप रोड तसेच इतर ठिकाणी राहणारे सिमी संघटनेचे कार्यकर्ते कुटुंबासह कुर्ला सोडून पळून गेले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here