आझाद मैदानात आठवड्याभरापासून आंदोलन करणा-या राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची अखेर मंगळवारी भेट झाली. राज्य सरकार परिचारिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, कामावर रुजू होण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. या बैठकीबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरीही सायंकाळपर्यंत परिचारिकांनी संप मागे घेतला नव्हता.
( हेही वाचा : यंदा जोरदार पाऊस कोसळणार)
परिचारिका संघटनेला हमी
परिचारिकांच्या नियुक्तीसह १२ मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली. या मागण्यांसह परिचारिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यात सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन अमित देशमुख यांनी परिचारिका संघटनेच्या सदस्यांना दिले. परिचारिकांच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ दिलीप म्हैसकर यांना देशमुख यांनी सूचना दिल्या. काही मागण्यांसाठी इतर विभागाचा अभिप्राय गरजेचा आहे. येत्या एक ते दीड महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, याबाबतची हमी देशमुख यांनी परिचारिका संघटनेला दिली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ दिलीप म्हैसकर उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी बैठक पार पडल्यानंतर लेखी हमी न मिळाल्याने सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी पुकारलेला बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी उद्या आरोग्यसेविका आणि परिचारिकाही संपावर असल्याने आरोग्य यंत्रणा खिळखिळी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community